Ticker

6/recent/ticker-posts

बी.पी.एल. शिधापत्रिकेसाठी ३ हजारांची लाच; कळमनुरी तहसीलमधील पुरवठा लिपिक रंगेहात पकडला



दिनेश पत्की कळमनुरी हिंगोली

कळमनुरी: तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेला लिपिक-टंकलेखक चक्रधर पंडितराव कदम (वय ३९) यास बी.पी.एल. योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही सापळा कारवाई आज दि. ८ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली.

तक्रारदार व त्यांच्या भावाने दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी कुटुंबीयांची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट करून बी.पी.एल. योजनेचा लाभ मिळण्यासाठी तहसील कार्यालय कळमनुरी येथे अर्ज दाखल केला होता. शिधापत्रिका मिळूनही प्रत्यक्षात स्वस्त धान्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर प्राधान्य कुटुंब योजना (पी.एच.एच.) अंतर्गत समावेशासाठी अर्ज केल्यानंतर अंतिम आदेश काढून देण्यासाठी आरोपी कदम यांनी सुरुवातीला प्रत्येकी ४ हजार रुपये प्रमाणे एकूण ८ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाप्रवि. विभागाकडे करण्यात आली.

दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी लाच मागणीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने तडजोड करत दोन फाईलसाठी प्रत्येकी १,५०० रुपये प्रमाणे एकूण ३,००० रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार आज सापळा कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदारास लाच रक्कम आपल्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगून पंच साक्षीदारांच्या समक्ष स्वीकारताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपीकडून कार्यालयीन ओळखपत्र, मोबाईल, किल्ल्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून मोबाईल तपासणी व घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन कळमनुरी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विकास घनवट, पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु तसेच लाप्रवि. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.