बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पुणे प्रादेशिक विभाग संलग्न ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. बैठकीत महासंघाच्या संचालिका सुजाता कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्या वेळी व्याजवाडी (ता. वाई) येथील विठ्ठल निवृत्ती पिसाळ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
यावेळी बैठकीत उपाध्यक्षपदी मृगेंद्र हिरेमठ, सचिवपदी डॉ. वैशाली भोसेकर आणि कोषाध्यक्षपदी मदनलाल दुल्लभदास देवी यांची निवड करण्यात आली, तसेच सदस्य म्हणून जनार्दन दादू घाडगे (गुरुजी), ज्योती पोपट मोहिते, जयसिंग रामचंद्र पवार, कल्याण सदाशिव भोसले, महादेव ज्ञानदेव घाडगे, विठ्ठलराव दिनकरराव जाधव यांची बिनविरोध करण्यात आली.
या वेळी नूतन अध्यक्ष श्री. पिसाळ यांनी आपण सर्वांनी मिळून सातारा समन्वय समितीचे चांगल्या प्रकारे कार्य करून जास्तीतजास्त ज्येष्ठ नागरिक संघ फेसकॉम पुणे यांना जोडण्यासाठी प्रयत्न करूया, असे सांगितले. श्रीमती कानिटकर म्हणाल्या, "पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील संलग्न ज्येष्ठ नागरिक संघांना सदिच्छा भेटी देऊन गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघ निर्मितीसाठी प्रयत्नशील राहावे. जेथे संघ निष्क्रिय आहेत तेथे अडचणी जाणून घेऊन त्यांना कृतिशील होण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे संघाची न्यास नोंदणी आवश्यक नसून विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात चैतन्य फुलवायचे आहे."
प्राचार्य प्रमोदिनी मंडपे यांनीही विचार मांडले. अर्चना कानिटकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.





Social Plugin