Ticker

6/recent/ticker-posts

वापटी-कुपटी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न.

 


 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

कारंजा तालुक्यातील वापटी-कुपटी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाच्या निमित्ताने बाल आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्काऊट-गाईडच्या खरी कमाई व सेवा उपक्रम अंतर्गत आयोजित या बाल मेळाव्याला गावकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद लाभला.

या बाल मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अनिरुद्ध खडसे, समिती सदस्य गणेश भिसे, रवी धाने यांच्यासह सर्व सभासद, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे तसेच हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी विक्री कौशल्य, व्यवहारज्ञान आणि स्वावलंबनाचा अनुभव घेत मेळाव्यातून हजारो रुपयांची विक्रमी विक्री केली. यशस्वी विक्रीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता.

सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योगशीलता, व्यवहारिक शिक्षण आणि सामाजिक सहभागाची भावना निर्माण झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत भरभरून प्रतिसाद दिला.

बाल आनंद मेळाव्यामुळे शालेय शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास साधला जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. या  यशस्वी बाळमेळाव्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील मुंदे, सहाय्यक शिक्षक रुपेश किन्हीकर, अजय शंकरपुरे, ताथोड सर , निमके मॅडम यांच्यासह स्काऊंड गाईड च्या विद्यार्थी आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यनी प्रयत्न केले.