गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
पाटस:दौंड तालुक्यातील बिरोबावाडी (पाटस) परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याने अक्षरशः थैमान घातले असून, येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या थराराची सुरुवात १० ते ११ जानेवारीच्या दरम्यान झाली, जेव्हा शेतात काम करत असताना राहुल सुनिल गावडे यांना बिबट्याचे पिल्लू दिसून आले होते. मादी बिबट्या जवळपासच असण्याच्या भीतीने त्यांनी विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव वाचवला होता. या घटनेनंतर १८ ते १९ जानेवारीच्या मध्यरात्री योगेश कोळेकर यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पूर्ण वाढलेला बिबट्या स्पष्टपणे कैद झाला, ज्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे ठोस पुरावे समोर आले होते.बिबट्याचा हा वावर केवळ दर्शनापुरता मर्यादित न राहता आता थेट पाळीव प्राण्यांच्या शिकारीपर्यंत पोहोचला आहे.
२३ ते २४ जानेवारीच्या मध्यरात्री बिबट्याने प्रमोद बाबासाहेब गावडे यांच्या गोठ्यातील शेळीवर हल्ला करून ती फस्त केली, ज्यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर वनविभागाने केवळ पंचनामा करून वेळ मारून नेली होती, परंतु बिबट्याचा धुमाकूळ थांबला नाही. २९ ते ३० जानेवारीच्या मध्यरात्री बिबट्याने पुन्हा एकदा आपला मोर्चा परशुराम वायाळ यांच्या गोठ्याकडे वळवला आणि तेथील शेळीची शिकार केली.एकामागून एक होणारे हे हल्ले आणि वनविभागाच्या संथ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. "माणसाचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?" असा सवाल स्थानिक नागरिक विचारत होते. अखेर वाढता दबाव आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ३० जानेवारी रोजी वनरक्षक रामेश्वर तेलंग्रे व बाबासाहेब कोकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रशासनाकडून आता या परिसरात 'ट्रॅप कॅमेरा' बसवण्यात आला असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अखेर पिंजराही लावण्यात आला आहे. बिबट्या लवकरात लवकर जेरबंद व्हावा, जेणेकरून शेतकरी निर्भयपणे आपली शेतीची कामे करू शकतील, अशी आर्त हाक बिरोबावाडीतील ग्रामस्थांनी दिली आहे.





Social Plugin