Ticker

6/recent/ticker-posts

जलसंधारण काळाची गरज : पाणी अडवा–पाणी जिरवा मोहिमेचा प्रभावी संदेश....

 



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत आयोजित कार्यक्रमात जलसंधारण ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रा. हणमंत देशमुख यांनी केले पुढे. बदलत्या हवामान परिस्थितीत पाण्याची टंचाई तीव्र होत असून, भविष्यातील पाणीपुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी जलसंधारण,पाण्याचे योग्य नियोजन व काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रा.देशमुख पुढे म्हणाले की, शेती, उद्योग, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन गरजांसाठी पाणी हे जीवनाधार आहे. मात्र वाढती लोकसंख्या, अनियमित पर्जन्यमान आणि भूजलाचा अतिरेकाने वापर यामुळे पाणी समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे पाणी साठवणे, पावसाचे पाणी अडवणे, ते जमिनीत जिरवणे आणि स्थानिक पातळीवर जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांनी जलसंधारणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात रविंद्र नलवडे यांनी “पाणी अडवा–पाणी जिरवा” या मोहिमेचे महत्त्व विशद केले. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून भावी पिढीसाठी जपून ठेवायची जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित केली. गावपातळीवर बंधारे, शोषखड्डे, नाला खोलीकरण, वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांमुळे भूजलपातळी वाढू शकते, असे त्यांनी नमूद केले.

पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करणे आवश्यक असून, शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धती, ठिबक व तुषार सिंचनाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पाण्याचा योग्य उपयोग केल्यास शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून, पाणी वाचवा, पाणी साठवा हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पुढील काळात जलसंधारण व पाणी बचतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचे अशा व्यक्त केली. 

कार्यक्रमासाठी श्री. संजय नलवडे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.के.जी कुंभार आणि प्रा.डॉ.एच.जी निमसे तसेच  शिबिरार्थी सर्व विद्यार्थी  उपस्थित होते.