नाशिक प्रतिनिधी अमन शेख
नाशिक। दि. १६ फेब्रुवारी २०२६: कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहराला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होईल. त्यासाठी सर्व नाशिककरांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी येथे केले.
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आय. एम. आर. टी. सभागृहात 4 थे विश्व मराठी संमेलन आयोजनाबाबत साहित्यिकांशी संवाद साधतांना मंत्री डॉ. सामंत बोलत होते. वेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, अवर सचिव नितीन डोंगरे, उर्मिला धादवड, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक रमेश पिंगळे, नंदकुमार बनकर, अप्पासाहेब गडाख यांच्यासह साहित्यिक, कवी, लेखक आदी उपस्थित होते.
येत्या 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीत विश्व मराठी संमेलन होईल. या संमेलनानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम होतील. त्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात येईल. संमेलनादरम्यान मराठी भाषा व साहित्याचा विकास, जागतिकीकरणाच्या युगातील मराठीची भूमिका, तंत्रज्ञानातील मराठीचा वापर, शिक्षणातील मातृभाषेचे स्थान तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन या विषयांवर विविध परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने व संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
तसेच संमेलनात कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे, नाट्यप्रयोग, कथाकथन, पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक संवाद तसेच युवा पिढीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी साहित्य, कला व परंपरेचे दर्शन घडविणारी विविध प्रदर्शनेही या निमित्ताने भरविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर विखुरलेल्या मराठी भाषिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा व संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे तसेच नव्या पिढीत मराठीबाबत अभिमान निर्माण करणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
संमेलनासाठी परदेशातून साहित्यिक हजर राहणार आहेत. यापूर्वीचे संमेलन पुणे येथे झाले. या संमेलनात पुस्तक आदान प्रदान हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या संमेलनातही हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात येईल. त्यासाठी नाशिककरांनी आपले योगदान द्यावे. त्यासाठी दहा रुपये वर्गणी ठेवण्यात येईल. या संमेलनाच्या मुख्य मंडपाला कवी कुसुमाग्रज नगरी असे नामकरण करण्यात येईल.
अन्य दालनांना मान्यवरांची नावे देण्यात येतील. मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिन तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला विशेष महत्व असणार आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसा हा सोहळा ठरणार असून नाशिकची ओळख जागतिक स्तरावर अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले .





Social Plugin