Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान विद्यालय निढळ च्या संरक्षण भिंतीचें मुख्याध्यापक यांच्या सेवानिवृत्त वेळी भूमिपूजन


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] ,

 रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय, निढळ  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जगदीश शंकर निर्मळ यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित व उल्लेखनीय शैक्षणिक सेवेनिमित्त आयोजित सेवापूर्ती सत्कार समारंभ तसेच विद्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. सेवाभाव, कृतज्ञता, विकास आणि स्नेहभाव यांचा सुंदर संगम घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन  चंद्रकांत दळवी यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करण्यात आले. या संरक्षण भिंतीमुळे विद्यालयाच्या सुरक्षिततेत भर पडणार असून विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

त्यानंतर सेवापूर्ती सत्कार समारंभाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सत्कारमूर्ती. जगदीश निर्मळ, अध्यक्ष  चंद्रकांत दळवी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुमधुर स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरेख सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उगलमोगले सर यांनी केले. त्यांनी श्री. निर्मळ सरांच्या ३३ वर्षांच्या प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. १४ जून १९९९ रोजी दरूज विद्यालयात सुरू झालेल्या त्यांच्या सेवाकाळात विद्यालयाला मान्यता मिळवून देणे, शाळेची इमारत उभारणे, गुणवत्तावाढ, विद्यार्थीसंख्या वाढविणे आणि शाळेचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कार्याचा गौरव त्यांनी केला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा परिचय श्री. भोसले सर यांनी करून दिला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. चंद्रकांत दळवी (IAS निवृत्त), चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. बी. एन. पवार, सहसचिव (पश्चिम), रयत शिक्षण संस्था, सातारा तसेच  श्री. कमलाकर महामुनी, कार्यकारी संचालक (क.वि.प्र.) उपस्थित होते. याशिवाय ॲड. किसनराव खामकर,  श्री. के. के. घाटगे, श्री. एन. टी. निकम (सहाय्यक विभागीय अधिकारी),  श्री. दिनेश दाभाडे (सहाय्यक विभागीय अधिकारी),  सौ. संगीता गायकवाड (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती खटाव-वडूज), श्री. नवनाथ जगदाळे (विभागीय अधिकारी) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

विद्यार्थी मनोगत या सत्रात कु. अविज्ञा घाडगे, कु. जीविका कुंभार आणि कु. अक्षदा जाधव यांनी निर्मळ सरांचे विद्यार्थ्यांवरील प्रेम, शिस्तप्रिय स्वभाव, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षक मनोगतामध्ये श्री. पी. एस. देशमुख यांनी निर्मळ सरांच्या नेतृत्वाखाली हनुमान विद्यालयाने गाठलेल्या यशाचा गौरव केला. विद्यालयाला मॉडेल स्कूल, 'माझी शाळा', मुख्यमंत्री शाळा पारितोषिक तसेच कर्मवीर पारितोषिक प्राप्त होण्यात निर्मळ सरांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.

निर्मळ सरांच्या कन्या कु. शिवदिनी निर्मळ हिने आपल्या वडिलांचे घरातील प्रेमळ, हसतमुख, कुटुंबवत्सल आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व भावनिक शब्दांत उलगडून सांगितले. बी.एड.चे वर्गमित्र श्री. जोशी सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. तुपे सर तसेच माजी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री. गुरव गुरुजी यांनीही निर्मळ सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.

यानंतर श्री. चंद्रकांत दळवी व सौ. सावंत मॅडम यांच्या हस्ते श्री. व सौ. निर्मळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुजबळ व त्यांच्या पत्नी तसेच केंद्रप्रमुख श्री. सागर मोहिते यांचाही सत्कार करण्यात आला. निळकंठेश्वर पतसंस्थेच्या वतीनेही श्री. दळवी व श्री. निर्मळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मान्यवरांच्या मनोगतात श्री. नवनाथ जगदाळे,  ॲड. किसनराव खामकर,  श्री. के. के. घाटगे,  श्री. कमलाकर महामुनी,  बी. एन. पवार तसेच अध्यक्ष श्री. चंद्रकांत दळवी यांनी श्री. निर्मळ यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, विकासकामांतील दूरदृष्टी, संस्थेप्रती असलेली निष्ठा आणि समाजाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांनी एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.

सत्कारमूर्ती श्री. जगदीश निर्मळ यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्था, सर्व मान्यवर, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. विशेषतः आपल्या सहचारिणी सौ. पवित्रा निर्मळ यांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या भक्कम साथीसाठी त्यांनी ऋण व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात  श्री. चंद्रकांत दळवी यांनी "सेवानिवृत्ती म्हणजे सेवेला पूर्णविराम नसून समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे," असे सांगत श्री. निर्मळ यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी श्री. निर्मळ यांची हनुमान विद्यालयाच्या स्कूल कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर केली. तसेच निर्मळ सरांनी प्रारंभी सात वर्षे आणि त्यांच्या पत्नींनी बारा वर्षे विनावेतन सेवाभावाने केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांचा उल्लेख प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी श्री. निर्मळ यांना चांदीचे नाणे देऊन विशेष सन्मानित केले.

योगायोगाने ३१ जुलै हाच श्री. निर्मळ यांचा वाढदिवस असल्याने उपस्थितांच्या शुभेच्छांच्या गजरात केक कापून वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. सावंत मॅडम यांनी केले. अध्यक्षांच्या अनुमतीने राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

श्री. जगदीश निर्मळ यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा आणि हनुमान विद्यालयाच्या विकासाचा नवा टप्पा अधोरेखित करणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला.