Ticker

6/recent/ticker-posts

आरटीओ चलनाचा बनावट मेसेज; अनोळखी लिंकवर क्लिक करताच ९ लाखांचा फटका.



नाशिक प्रतिनिधी अमन शेख,

नाशिक। दि. १६ फेब्रुवारी २०२६: शहरात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, आरटीओ चलन पेंडिंग असल्याचा बनावट मेसेज पाठवून एका नागरिकाकडून तब्बल ९ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच धर्तीवर गॅस बिल थकबाकीचे कारण देत दुसऱ्या एका व्यक्तीची ६ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये सायबर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत फिर्यादीच्या मोबाईलवर ‘आरटीओ चलन पेंडिंग’ असल्याचा मेसेज आला. त्यासोबत पाठविण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून ‘एम परिवहन’ नावाचे अॅप डाउनलोड करण्याचे निर्देश देण्यात आले होते. चलन भरावे लागेल, या भीतीपोटी फिर्यादीने कोणतीही खातरजमा न करता लिंक उघडली. संबंधित अॅप इन्स्टॉल करताच मोबाईलवरील नियंत्रण सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात गेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या विविध क्रेडिट कार्डांचा वापर करून टप्प्याटप्प्याने सुमारे ९ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे

दुसऱ्या प्रकरणात, गॅस जोडणीचे बिल थकित असल्याचा बनावट संदेश पाठवण्यात आला. बिल तत्काळ भरले नाही तर सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा देत अनोळखी लिंक पाठविण्यात आली. संबंधित व्यक्तीने लिंकवर व्यवहार केल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून ६ लाख ७० हजार रुपये लंपास करण्यात आले.

सायबर गुन्हेगारांकडून विविध आमिषे आणि भीती दाखविण्याचे डावपेच वापरले जात असून, नागरिकांनी अनोळखी लिंक, अॅप किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ अथवा संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क साधून खातरजमा करावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.