तब्बल १३ तास उपवास ठेवत चिमुकल्याने दाखवला श्रद्धा आणि संयमाचा आदर्श
देगलूर - प्रतिनिधी
मुस्लिम समाजाचा दि. १९ फेब्रुवारीपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असून या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवून अल्लाहची उपासना करतात. आत्मशुद्धी, संयम आणि त्याग यांचा संदेश देणाऱ्या या पवित्र महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
देगलूर येथील 9 वर्षीय शेख अबूहुरेरा पाशा या चिमुकल्याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तब्बल १३ तास अन्न व पाणी न घेता तिने श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण घालून दिले.
इतक्या लहान वयात पहिलाच रोजा पूर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोजा पूर्ण केल्यानंतर कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन करत प्रोत्साहन दिले. नातेवाईकांनीही अबूहुरेराचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अबूहुरेराच्या पहिल्या रोजामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या या कृत्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लहान वयात धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवून त्याने दाखवलेला संयम इतर मुलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
रमजान महिन्यात रोजा ठेवण्यामागील उद्देश केवळ उपवास नसून आत्मसंयम, दानधर्म आणि प्रार्थना यांद्वारे आध्यात्मिक उन्नती साधणे हा आहे. शेख अबूहुरेराने पूर्ण केलेला हा पहिला रोजा तिच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे.





Social Plugin