Ticker

6/recent/ticker-posts

७७ वर्षांनंतरही महिलांच्या प्रसाधनगृहांचा प्रश्न प्रलंबित;



डॉ.नीरज वाघमारेंनी प्रशासनाचे वेधले लक्ष.

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

यवतमाळ नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आज दिनांक ९ फेब्रुवारी (सोमवार) रोजी नगरपरिषद यवतमाळ येथे नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा होणार होती.मात्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी गैरहजर असल्याने ही सभा वेळेवर रद्द करण्यात आली,त्यामुळे अधिकृत चर्चा होऊ शकली नाही.सभा रद्द झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष,गटनेते तथा नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी यावेळी शहरातील अत्यंत महत्त्वाचे नागरी व सामाजिक प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.त्यांनी आपल्या पांढऱ्या सदऱ्यावर ठळक अक्षरांत प्रश्न लिहून ते परिधान करत सभागृह परिसरात उपस्थिती नोंदवली.त्यांच्या सदऱ्यावर “माता-भगिनींना प्रसाधनगृह कधी?”

“सफाई कामगारांचा प्रश्न – किमान वेतन कधी?”असे दोन ज्वलंत प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आले होते.या प्रतीकात्मक कृतीमुळे सभागृह परिसरासह उपस्थित नागरिक आणि प्रसार माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली.

डॉ.नीरज वाघमारे यांनी यावेळी नमूद केले की,२६ जानेवारी रोजी देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,मात्र याच ७७ वर्षांच्या कालावधीत ब्रिटिशकालीन भारतानंतर,स्वातंत्र्योत्तर काळात आणि आज २०२६ पर्यंत यवतमाळ शहरात महिलांसाठी साधे सार्वजनिक लघुशंकेचे प्रसाधनगृहही निर्माण होऊ शकले नाही,ही गंभीर बाब आहे.भारतीय जनता पार्टी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा विविध पक्षांनी सत्तेचा उपभोग घेतला,तरीही हा मूलभूत प्रश्न प्रलंबितच राहिला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तसेच यवतमाळचा दुर्गोत्सव हा देशातील क्रमांक दोनचा दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो,मात्र अशा सांस्कृतिक परंपरा असलेल्या शहरात महिलांसाठी नगरपालिकेमार्फत आवश्यक व मुबलक सुविधा उपलब्ध नसणे हे महिलांच्या अस्तित्वाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सफाई कामगारांना किमान वेतन,सेवा-सुरक्षा आणि मूलभूत हक्क अद्याप पूर्णपणे मिळत नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.सभा रद्द असली तरी या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये,विशेषतः प्रसार माध्यमांमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून,आगामी काळात नगरपालिकेच्या कारभारात या मुद्द्यांवर ठोस निर्णय होणार का,याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.