एमपीएससीत राज्यात १२४ वी रँक; माजी सैनिकांच्या कन्येचा जिद्दीचा विजय
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
जाखणगाव (ता. खटाव) येथील प्राची संजय कुलकर्णी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२४ च्या परीक्षेत राज्यात २८३ वी रँक मिळवत कृषी अधिकारी (राजपत्रित अधिकारी गट–ब) पदावर यशस्वीपणे झेप घेतली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत मिळवलेल्या या यशामुळे खटाव तालुक्याचा मान उंचावला आहे.
प्राची या माजी सैनिक संजय कुलकर्णी यांच्या कन्या होत. देशसेवेची परंपरा जपणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या प्राची यांना शिस्त, चिकाटी आणि कर्तव्यनिष्ठेचे संस्कार घरातूनच लाभले. वडिलांनी सैन्यात बजावलेल्या सेवेमुळे घरात नेहमीच देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाचे वातावरण होते. याच प्रेरणेने प्राची यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीत सातत्य ठेवत यश मिळवले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण पुसेगाव येथील श्री. सेवागिरी विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण महाराजा सयाजीराव जुनिअर कॉलेज, सातारा येथे झाले. पुढे कृषी महाविद्यालय, पुणे येथून त्यांनी पदवी संपादन केली. पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तसेच अंतिम वर्षात श्री. सेवागिरी अभ्यासिकेत नियमित व नियोजनबद्ध अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि कुटुंबाच्या पाठबळाला दिले. “शेतकरी बांधवांसाठी प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असून जबाबदारीही तितकीच मोठी आहे,” असे प्राची यांनी नमूद केले.
प्राची यांच्या निवडीमुळे जाखणगाव व परिसरात आनंदाचे वातावरण असून आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्या डॉ.प्रिया शिंदे, सर्व माजी सरपंच , उपसरपंच, आजी - माजी सैनिक संघटना, ग्रामस्थ व विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. माजी सैनिकांच्या कन्येने मिळवलेल्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.





Social Plugin