Ticker

6/recent/ticker-posts

ब्राम्हणवाड्यात येथील विहीर दुरुस्ती योजनेत लाच मागितल्याचा आरोप------ कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन सादर



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

कारंजा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे शासनाच्या २०२५-२६ विहीर दुरुस्ती योजनेत गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. योजनेत मंजूर लाभार्थी असतानाही प्रत्यक्ष लाभदेण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व सरपंचांकडून लाचेची मागणी होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे.

शासनाच्या यादीत नावे असताना तसेच पंचनामे पूर्ण झाले असतानाही लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लाभदेण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. लाच न दिल्यास मास्टर यादीतून नावे वगळण्याची धमकी दिली जात असल्याचेही शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या योजनेतील मंजूर लाभार्थ्यांमध्ये भास्कर तुरक, मंगेश मुंदे, वनमाला मुंदे, अक्षय मुंदे, भागवत मुंदे, चेतन मुंदे, सविता मुंदे, हिम्मत मुंदे, वत्सला मुंदे, अर्चना मुंदे व जानराव मुंदे यांचा समावेश आहे. सर्व लाभार्थ्यांचे पंचनामे पूर्ण असूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. इतकेच नव्हे तर सरपंच व ग्रामसेवकांनी काही पात्र लाभार्थ्यांना घर न बांधता घरकूल योजनेचा लाभनियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. 

त्यामुळे विहीर दुरुस्ती योजनेसह इतर शासकीय योजनांमध्येही गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मंजूर लाभार्थ्यांना कोणतीही अडथळे न आणता तातडीने लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी या प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. आता प्रशासन या आरोपांची कितपत गंभीर दखल घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.