Ticker

6/recent/ticker-posts

सौ. भाग्यश्री विनोद गणवीर यांची विदर्भराज्य आंदोलन समितीच्या कारंजा लाड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती



 गुणवंत राठोड कारंजा लाड (प्रतिनिधी) :

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करणाऱ्या सौ. भाग्यश्री विनोद गणवीर यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कारंजा लाड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. या नियुक्त्ती समारंभास विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, कोअर कमिटी सदस्य ओमप्रकाश तापडिया, डॉ. पद्माताई राजपूत, ज्येष्ठ नेते दिनकरराव सराफ तसेच महाराष्ट्र न्यूज २४ लाईव्ह चॅनेलचे संचालक विनोद गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे यांनी सौ. भाग्यश्री गणवीर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून, महिलांना संघटित करून विदर्भ राज्य आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचे नमूद केले.

 त्यांनी नवनियुक्त तालुका महिला आघाडी अध्यक्षांना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माहितीपत्रक व इतर वाचनसामग्री भेट देऊन त्यांच्या भावी रचनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी सौ. भाग्यश्री गणवीर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील दृष्टीकोन, महिलांचे संघटन व बालकल्याण क्षेत्रातील कार्याचा अनुभव लक्षात घेता त्यांची ही निवड विदर्भराज्य आंदोलनासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नियुक्त्तीनंतर बोलताना सौ. भाग्यश्री गणवीर यांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ध्येय-धोरणांशी प्रामाणिक राहून महिला आघाडीच्या माध्यमातून जनजागृती, संघटन आणि रचनात्मक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या नियुक्तीमुळे कारंजा लाड तालुक्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीला नवसंजीवनी मिळाली असून, आगामी काळात महिलांच्या सहभागातून आंदोलन अधिक बळकट होईल, असा आशावाद कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.