Ticker

6/recent/ticker-posts

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कारवाईला शिगावमध्ये विरोध; नायब तहसीलदारांना धमकी, कॉन्ट्रॅक्टरला मारण्याचा प्रयत्न; पोलिस बंदोबस्तातही काम बंद.


पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर 

बोईसर (ता. पालघर) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत शिगाव परिसरात अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी महसूल प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

कारवाईदरम्यान काही व्यक्तींनी नायब तहसीलदार सुदेश शिंदे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली तसेच थेट धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने, “तू परत या जागेवर ये, तुला बघतो कसा येतो तू जागेवर” अशा शब्दांत उघड इशारा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

याचदरम्यान संबंधित व्यक्तीने संपूर्ण काम पूर्णपणे बंद पाडले आणि “आम्ही पुढे काम करून देणार नाही” असा स्पष्ट इशारा दिल्यामुळे कारवाई काही काळ ठप्प झाली. विशेष म्हणजे, घटनास्थळी पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त असतानाही काही मोजक्या लोकांनी काम रोखल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कॉन्ट्रॅक्टरलाही धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

सदर प्रकारामुळे महसूल विभागाकडून संबंधित व्यक्तींविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारी कामात अडथळा आणणे व शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असतानाही तत्काळ कठोर कारवाई झालेली नसल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अशा प्रकारे अडथळे येत असतील तर प्रकल्प वेळेत पूर्ण होणार का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, महसूल व पोलीस प्रशासनाकडून अधिकृत निवेदन येणे अपेक्षित असून, दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.