ग्राम संवाद सरपंच संघटनेचे आवाहन
राजपाल बनसोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मांडवा येथे व्यसनमुक्तीवर आधारित नाट्यस्वरूप उद्बोधन व मार्गदर्शनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सामाजिक उपक्रमासाठी ग्राम संवाद सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष यादव गावंडे व माजी तालुका प्रमुख यादव पवार यांनी ग्रामस्थांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले आहे. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने कुटुंबव्यवस्था, युवकांचे भविष्य आणि समाजाची घडी विस्कटत असल्याची खंत व्यक्त करत या उपक्रमाची गरज त्यांनी अधोरेखित केली. “शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजहिताचे कार्य करणे हीच खरी शिवजयंती,” असे मत यादव गावंडे यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, व्यसनामुळे केवळ व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे युवकांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यावे. माजी तालुका प्रमुख यादव पवार यांनीही या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “शिवजयंती उत्सव हा केवळ मिरवणूक, फटाके किंवा दिखाऊ कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता समाजप्रबोधनाचा संदेश देणारा असावा. व्यसनमुक्त गाव हीच खरी शिवरायांना अभिवादन करण्याची पद्धत आहे.” त्यांनी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना योग्य संस्कार देण्याचे आवाहन केले.
व्यसनमुक्ती केंद्र हिंगणा, जि. वर्धा यांच्या वतीने सादर होणाऱ्या या कार्यक्रमात नाट्यस्वरूपातून व्यसनाचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले जाणार आहेत. तंबाखू, दारू, गुटखा, अमली पदार्थ यांसारख्या व्यसनांमुळे होणारी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी यावर प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच व्यसनातून मुक्त होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, समुपदेशन आणि उपचार यांची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. कार्यक्रमात स्थानिक कलाकारांचे लोकजागृतीपर गीत-गायनही होणार असून, युवकांना प्रेरणादायी संदेश दिले जाणार आहेत. गावातील विविध सामाजिक संस्था, मंडळे व ग्रामपंचायत यांचा या उपक्रमाला पाठिंबा लाभला आहे.हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री दत्त मंदिर, मांडवा येथे होणार आहे. ग्रामस्थांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्यसनमुक्तीचा संकल्प करावा आणि आपल्या गावाला आदर्श, सुसंस्कृत व व्यसनमुक्त बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिवरायांच्या प्रेरणेने समाजहिताचा मार्ग स्वीकारत व्यसनमुक्तीचा जागर घडविणारा हा उपक्रम निश्चितच मांडवा परिसरासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.





Social Plugin