बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव (ता. खटाव) येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात ३ ते ४ चोरट्यांनी शस्त्रांसह दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरमालक मुस्ताक बशीर शिकलगार यांनी जीवाची पर्वा न करता चोरट्यांशी निकराची झुंज दिली. मात्र, चोरट्यांनी लोखंडी गजाने केलेल्या हल्ल्यात मुस्ताक आणि त्यांची मुलगी अलिशा जखमी झाले असून, चोरटे २० हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बशीर शिकलगार व दिलावर शिकलगार यांच्या घरावर ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी हल्ला केला. घराचा दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत असताना मुस्ताक यांना जाग आली. चोरट्यांना पाहताच मुस्ताक यांनी मागे न हटता एका चोरट्याला घट्ट पकडून धरले.
जीवघेणी झटापट आणि मुलीवर वार
मुस्ताक यांनी एका चोरट्याला पकडून ठेवल्याने इतर दोन साथीदारांनी त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी हल्ला चढवला. त्यांनी मुस्ताक यांच्या हातावर लोखंडी गजाने सपासप वार केले, तरीही त्यांनी पकड सोडली नाही. अखेर, मुस्ताक चोरट्याला सोडत नाहीत हे पाहून एका चोरट्याने समोर असलेल्या त्यांच्या मुलीवर गजाने वार करण्याचा प्रयत्न केला.
मुलगी आलिशा तिच्या जीवावर बेतलेले पाहून मुस्ताक यांनी नाइलाजास्तव चोरट्याला सोडून दिले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील २० हजार रुपयांची रोकड लंपास केली आणि तिथून पलायन केले.
शेजाऱ्यांच्या मदतीचा अभाव
या घटनेत मुस्ताक यांनी एकट्याने तिघांशी लढा दिला. जर वेळीच शेजाऱ्यांनी धावून येऊन साथ दिली असती, तर चोरटे रंगेहात पकडले गेले असते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या हल्ल्यात मुस्ताक यांच्या मुलीलाही दुखापत झाली आहे.
पोलीस तपास सुरू:
या घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.





Social Plugin