Ticker

6/recent/ticker-posts

*स्वच्छता, दिवाबत्ती, व्यापारी संकुलाचे नामाकरण आणि दर्ग्याच्या जमीनीसंदर्भात काँग्रेस पक्षाकडून निवेदन*



देगलूर / प्रतिनिधी : 

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, दिवाबत्ती आणि सायरनची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच चमकुमढी व्यापारी संकुलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी काँग्रेस पक्षाची ठोस भूमिका घेण्यात आली आहे. 

मुस्लिम बांधवांना रोजा काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रमजान महिन्यात पहाटे ‘सहरी’च्या वेळी नागरिकांना जाग येण्यासाठी सायरनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच मशिदी परिसरात व मुख्य रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवून दिवाबत्ती सुरळीत ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदनात देगलूर येथील चमकुमढी व्यापारी संकुलास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली आहे. सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक म्हणून व्यापारी संकुलाला त्यांचे नाव देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच शहरातील दर्ग्याशी संबंधित जमीन मूळ दर्गा संस्थेकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाबाबत पारदर्शकता व न्याय्य निर्णय व्हावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.

यावेळी विरोधी पक्षाचे गटनेता मिरामोहिय्योद्दीन, स्विकृत सदस्य अविनाश निलमवार, नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे, नगरसेवक लक्ष्मण कंधारकर, नगरसेवक मोहित्तोद्दीन रफाई, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख नेते उपस्थित होते. शहरातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवत सर्व समाजघटकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असा इशारा देखील देण्यात आला.