डॉ.यशवंत पवार @15/02/2026
कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर
कन्नड तालुक्यातील कानडगाव… काळ्या भुईच्या साधेपणाने नटलेलं, पण माणुसकीच्या श्रीमंतीने ओथंबलेलं गाव. या मातीतून उगवलेल्या एका लेकराने आज आकाशाला गवसणी घातली आणि संपूर्ण गावाने त्या यशाचा उत्सव साजरा करत इतिहासात एक सुंदर पान जोडले.
श्री. सुरेश चिमटे हा कानडगावचा होतकरू युवक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत “उपअभियंता (यांत्रिकी), राजपत्रित गट-अ, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन” या राजपत्रित वर्ग एक पदावर निवड होऊन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
मातीवर पाय ठेवून आकाशाची उंची गाठणाऱ्या या भूमिपुत्राच्या यशाचा अभिमान संपूर्ण गावाच्या डोळ्यांत दाटून आला.
लहानपणी गावाच्या धुळीत खेळलेला ‘भावड्या’ आज राज्याच्या प्रशासनात मानाचे स्थान मिळवताच कानडगावने त्याला आपल्या प्रेमाच्या कवेत घेत भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला. हा केवळ सत्कार नव्हता, तर गावाच्या मायेचा, अभिमानाचा आणि प्रेरणेचा उत्सव होता.
आजच्या धकाधकीच्या, यंत्रमय आणि स्वकेंद्रित होत चाललेल्या समाजजीवनात यशस्वी झालेल्या तरुणांना आपल्या मायमातीची, माणसांची शाबासकी किती आवश्यक आहे हे अनेकदा विसरले जाते. पण अशा कौतुकाच्या दोन शब्दांनी, प्रेमाच्या एका स्पर्शाने तरुणांच्या पंखात हजार हत्तींचे बळ संचारते. त्यांची जिद्द अधिक बळकट होते, स्वप्नांना नवे आकाश मिळते.
दुर्दैवाने आज अनेक ठिकाणी यशस्वी तरुणांकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांच्या यशाचा गौरव होत नाही. परंतु कानडगावने या उलट चित्र समाजासमोर उभे केले. काळ्या भुईत वसलेल्या या छोट्याशा गावाने सुरेश चिमटे यांच्या नागरी सत्काराच्या माध्यमातून एक भव्य-दिव्य आदर्श निर्माण केला. यशस्वी झालेल्या आपल्या लेकराला डोक्यावर घेऊन, त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान करून समाजाने त्याला नव्या उंचीवर नेण्याची परंपरा इथं जपली गेली.
हा सत्कार केवळ एका युवकाचा नव्हे, तर जिद्दीचा, कष्टांचा आणि स्वप्नांच्या पूर्तीचा होता. कानडगावच्या मातीतून उगवलेले हे यश आता अनेक तरुणांच्या डोळ्यांत नवे स्वप्न रुजवेल, त्यांना ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देईल.खऱ्या अर्थाने, कानडगावने आज समाजापुढे एक जिवंत आदर्श उभा केला यशस्वी होणाऱ्या लेकरांना मायेचा हात द्या, त्यांच्या पंखांना बळ द्या… ते नक्कीच आकाशालाही गवसणी घालतील. ही भावना यावेळी कवी ज्ञानेश्वर गायके आणी ईतर मान्यवरांनी व्यक्त करताना गावातील सर्व लहान थोर आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.





Social Plugin