Ticker

6/recent/ticker-posts

हेडलाईन-कांदा पीक 'व्हेंटिलेटर'वर.




सब हेडलाईन1-आवर्तनासाठी दौंडच्या शेतकऱ्यांची आर्त हाक!

सब हेडलाईन2-मुबलक पाणी साठा असूनही खडकवासला कालव्याचे आवर्तन रखडले!

पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

दौंड:राज्यात गेल्या (२०२५) वर्षात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणे १०० टक्के भरली असतानाही, दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या भीषण पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पाटस, बिरोबावाडी, बेटवाडी, गिरीम, कुरकुंभ, रोटी, हिंगणीगडा, वासुंदे आणि कुसेगाव या परिसरात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

​दौंड तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. यंदाही या सर्व परिसरात कांद्यासह उन्हाळी पिके म्हणून कलिंगड, काकडी आणि खरबूज यांसारख्या फळपिकांची मोठी लागवड झाली आहे. मात्र, ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याने ही पिके आता पाण्याअभावी करपून जाण्याच्या स्थितीत आहेत. पिकांना पाणी देण्यास मर्यादा येत असल्याने आणि डोळ्यांसमोर पीक जळताना दिसत असल्याने, "पाण्याअभावी ही पिके सोडून द्यावीत का?" असा हतबल प्रश्न आता इथला शेतकरी विचारत आहे.

​वास्तविक पाहता, दौंड तालुक्यात दरवर्षी सुमारे ५० लाख टन उसाचे उत्पादन घेतले जाते. वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि शेतीची गरज यामुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये पुरेसा साठा आहे, मात्र कालवा सल्लागार समिती आणि पाटबंधारे विभागाच्या ढसाळ नियोजनामुळे खडकवासला कालव्याचे आवर्तन वेळेवर सुटण्यास अडचणी येत आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका थेट बळीराजाला बसत असून, हक्काचे पाणी वेळेवर न मिळाल्यास कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

​"कांदा पिकासाठी रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली. हजारो रुपये कर्ज काढून खते, बियाणे आणली. आता पीक हातात येण्याच्या वेळीच पाणी आटलंय. डोळ्यांदेखत पीक जळताना बघवत नाही. जर आठ दिवसात कालव्याचं पाणी सुटलं नाही, तर आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ."

— स्थानिक शेतकरी