Ticker

6/recent/ticker-posts

कुंभमेळा २०२७: पूर्वतयारीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाची आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा.



नाशिक, प्रतिनिधी ,अमन शेख ,

नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाने बुधवारी विविध विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन नोडल अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कर्नल व्ही. एन. सुपणेकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना स्थळनिहाय धोका व आपत्ती यांची संभाव्यता,प्रतिबंध उपाययोजना,उपलब्ध संसाधनांची ओळख व प्रभावी वापर, क्षमता बांधणी , जलद प्रतिसाद यंत्रणा याकामी मानक कार्यपद्धती (SOPs) तयार करणे तसेच विभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

सिंहस्थ काळातील प्रतिसाद यंत्रणा ही मानवी जीविताचे संरक्षण, घटनेवर नियंत्रण मिळविणे आणि मालमत्ता व महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण या तीन प्रमुख तत्त्वांवर आधारित असेल,असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विभागांना स्थलांतर ,तात्पुरती निवारा केंद्रे, संसाधन तैनाती क्षेत्रे आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादासाठी खुल्या जागांची निश्चिती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) चे सह संचालक पल्लवी गवळी आणि अतुल जोशी यांनी आधुनिक हवामान अंदाज व पूर्वसूचना प्रणालीचे सादरीकरण केले. या प्रणालीद्वारे पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग व इतर हवामान घटकांचे प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण आणि अंदाज उपलब्ध होतात. कुंभमेळा प्राधिकरण या तंत्रज्ञानाचे सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या आवश्यकतेनुसार गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि प्रतिकूल हवामानातील निर्णय प्रक्रियेसाठी वापरण्याचा विचार करीत आहे.

यंत्रणेच्या तयारीवरही विशेष भर देण्यात आला. रुग्णालयांना ट्रायाज प्रणाली, वाढीव क्षमता व्यवस्था आणि रक्तपेढ्यांशी समन्वय आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यशाळेत विभागांमधील समन्वय आणि खासगी आस्थापनांचा जोखीम मूल्यांकन प्रक्रियेत समावेश यावरही भर देण्यात आला.