अमळनेर, दि. २६ फेब्रुवारी २०२६
अमळनेर नगर परिषदेच्या सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पास आज नगरपरिषद सभागृहात झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ही सभा नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेमध्ये एकूण रु. ३८३.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोणत्याही प्रकारची कर वाढ करण्यात आली नाही.
अमळनेर नगरपरिषद मध्ये आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर झाला असून हा आपल्या अमळनेरच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप आहे. पायाभूत सुविधांना प्राधान्य देत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण यावर भर देण्यात आला आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा वाढवण्याचाही विशेष विचार करण्यात आला आहे.
शहरातील वाढत्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा, पथदिवे व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच कर वसुली सुधारणा, आणि विविध शासकीय योजनांतून निधी आणण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.
हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून अमळनेर उज्ज्वल भविष्यासाठीची दिशा आहे.
नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा अधिक सक्षम व दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देणे, तसेच शहराचा सर्वांगीण विकास साधणे हा या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सविस्तर चर्चेनंतर सभागृहाने हा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर केला असून त्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
मंजूर अर्थसंकल्प पुढील अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या निर्णयामुळे अमळनेर शहरातील विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






Social Plugin