भूमिहीन कुटुंबांना दिलासा देणारा ठराव : गट ग्रामपंचायत लोणारा (निंबोली) चा निर्णय
कळमेश्वर : लोणारा (निंबोली) गट ग्रामपंचायतीच्या वतीने २६ जानेवारीला झालेल्या विशेष बैठकीत ग्रामपंचायत हद्दीतील भूमिहीन नागरिकांच्या कुटुंबात एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला ग्रामपंचायत मार्फत ३,००० रुपये आर्थिक साहाय्य निधी देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व भूमिहीन कुटुंबांवर अचानक येणाऱ्या संकटाच्या काळात आधार देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
बहुसंख्य भूमिहीन कुटुंबांचे उत्पन्नाचे साधन मर्यादित असून, कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळते. अंत्यसंस्कार व त्यानंतरच्या विधीसाठी तातडीने पैशांची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने आपल्या निधीतून थेट आर्थिक मदत देण्याचा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील निर्णय घेतला आहे.
ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली असून, लोणारा येथील रहिवासी केशव शिरपूरकर यांच्या पत्नी बेबी शिरपूरकर यांचे नुकतेच निधन झाले होते. या दुःखदप्रसंगी ग्रामपंचायतीच्या या तत्काळ ठरावानुसार ३,००० रुपयांची आर्थिक मदत धनादेशाद्वारे केशव शिरपूरकर यांना प्रदान करण्यात आली. यामुळे शोकाकुल कुटुंबाला काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत असून, संकटसमयी गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्रामपंचायतीची भूमिका अधोरेखित होत आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना मदतीचा आधार मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
सामाजिक बांधीलकीतून हा ठराव मंजूर केला आहे. मृत्यूच्या वेळी अंत्यसंस्कार व इतर आवश्यक खर्चासाठी कुटुंब अडचणीत सापडते. अशावेळी ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी उभी आहे, हा संदेश देणे आमचे कर्तव्य आहे.- आशिष डेहनकर, सरपंच, गट ग्रामपंचायत लोणारा (निंबोली)
ग्रामपंचायतच्या ठरावानुसार भूमिहीन कुटुंबांना साहाय्य निधी देण्याची प्रक्रिया पारदर्शक व नियमांनुसार राबवली जाईल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संकटाच्या काळात आधार देणारा हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल. दिनेश सहारे, ग्रामपंचायत अधिकारी, गट ग्रामपंचायत लोणारा (निंबोली)





Social Plugin