पीएम.श्री.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव चा अभिनव उपक्रम
गुणवंत राठोड कारंजा लाड (प्रतिनिधी)
पीएम.श्री. जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कामरगाव येथे तरुण संपादक मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि भावविश्व यांचा जागर शाळेच्या प्रांगणात अनुभवायला मिळाला.
या विशेष दिनानिमित्त शाळेच्या परिसरात ‘पुस्तकांचे झाड’ हा आगळावेगळा आणि लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आला. झाडांच्या फांद्यांना विविध मराठी पुस्तके बांधून ज्ञानाची फुले आणि विचारांची फळे जणू प्रत्यक्ष फुललेली दिसत होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृतीची गोडी निर्माण होऊन मराठी भाषेशी त्यांचे नाते अधिक घट्ट झाले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या कवी व लेखकांविषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्या साहित्याचा आपल्या जीवनावर झालेला प्रभाव भावनिक शब्दांत मांडला. कुणी संत साहित्याची ओळख करून दिली, तर कुणी आधुनिक मराठी कवींच्या कविता व विचारांमधील सामाजिक भान अधोरेखित केले. कुणी बहिणाबाईंची गाणी गायली तर कोणी चक्क मराठी भाषेला पत्रच लिहिले .प्रत्येक मनोगतातून मराठी भाषेवरील प्रेम, अभिमान आणि जिव्हाळा स्पष्टपणे जाणवत होता.
मराठी भाषेला उद्देशून विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे हा कार्यक्रमाचा अत्यंत हृदयस्पर्शी भाग ठरला. “आईसारखी जपणारी भाषा” आणि “संस्कार देणारी बोली” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी मराठीबद्दलची आपुलकी व्यक्त केली. या पत्रांचे वाचन होत असताना उपस्थितांच्या मनातही मराठी भाषेबद्दलचा सन्मान अधिक दृढ झाला.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृती, इतिहास आणि भावनांची ओळख आहे, हा संदेश या उपक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाला. नावीन्यपूर्ण संकल्पना, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे मराठी भाषा गौरव दिनाचा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनश्री चौके प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी सोनम पांडे उपस्थित होत्या.सिद्धी जुननकार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती.कार्यक्रमाचे संचलन श्रावणी मुंदे,राधा निंघोट प्रास्ताविक कृष्णाई गाढवे तर आभार मयुरी इंगोले यांनी मानले.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. तरुण संपादक मंडळाच्या नीता तोडकर, गोपाल खाडे, दिपाली खोडके,चेतन करडे, पुष्पा व्यवहारे, गजानन देशमुख आदींचे सहकार्य लाभले.





Social Plugin