Ticker

6/recent/ticker-posts

दौंड तालुक्यात मतदानासाठी यंत्रणा सज्ज.


ओळखपत्र नसेल तरी काळजी नको; 'या' १२ पुराव्यांच्या आधारे करा मतदान!

पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

दौंड: पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदानाला आज ७ फेब्रुवारी रोजी दौंड तालुक्यात प्रारंभ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांवर रंगलेला प्रचाराचा धुरळा आता थंडावला असून मतदारांचा कौल कोणाकडे जातो, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार असून ती सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

या निवडणुकीत तालुक्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, ग्रामीण भागाच्या विकासाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा निर्णय आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली असून यवत, केडगाव, राहू, पाटस आणि वरवंड यांसारख्या मोठ्या केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्रच नाही, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी १२ अधिकृत ओळखपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी केंद्रांवर विशेष सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मतदानानंतर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, आजचा दिवस दौंडच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. प्रशासनाने नागरिकांना मोठ्या संख्येने बाहेर पडून शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.


मतदानासाठी ग्राह्य धरली जाणारी अधिकृत ओळखपत्रे:

१.मतदार ओळखपत्र (Voter ID)

२.आधार कार्ड

३.पॅन कार्ड

४.बँक/पोस्ट ऑफिसचे फोटोसहित पासबुक

५.मनरेगा जॉब कार्ड

६.ड्रायव्हिंग लायसन्स

७.भारतीय पासपोर्ट

८.फोटोसहित निवृत्ती वेतन दस्तऐवज

९.केंद्र/राज्य सरकारचे सेवा ओळखपत्र

१०.कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

११.आमदार/खासदार यांचे अधिकृत ओळखपत्र

१२.युनिक डिसॅबिलिटी आयडी


मतदान प्रक्रियेचे ५ सोपे टप्पे

​१.पहिल्या अधिकाऱ्याला ओळखपत्र दाखवा, तो यादीत नाव तपासेल.

२.दुसरा अधिकारी बोटाला शाई लावेल; रजिस्टरवर सही करा आणि पावती घ्या.

३.तिसऱ्या अधिकाऱ्याकडे पावती द्या, तो ईव्हीएम (EVM) मशिन सुरू करेल.

४.मतदान कक्षात जाऊन पसंतीच्या उमेदवारासमोरील 'निळे बटण' दाबा.

५.'बीप' आवाज येईल आणि VVPAT मशिनवर ७ सेकंद आपल्या पसंतीची पावती तपासा.