Ticker

6/recent/ticker-posts

दादा, अण्णांचा वारसा जपण्यासाठी साथ द्या राहुल पाटील; खटावची जनता घराणेशाही, दहशत झुगारून आमच्याबरोबर

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

खटावच्या प्रगल्भ आणि वैचारिक राजकारणाच्या अध्यायातील माजी आमदार (कै.) चंद्रहार पाटील आणि केशवराव पाटील यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मी मायबाप जनतेचे आशीर्वाद मागत आहे. जनतेची सेवा करणे ही पाटील कुटुंबाची परंपरा आहे. सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होत लोकाभिमुख समाजकारण केले आहे, त्यामुळेच दडपशाहीला झुगारून खटाव गटातील जनता आमच्याबरोबर ठाम आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल पाटील यांनी व्यक्त केला.खटाव जिल्हा परिषद गट आणि गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घरभेटीप्रसंगी ते बोलत होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, "खटावच्या राजकारणात (कै.) अण्णा, दादांनी तेहयात असताना घराणेशाहीला कधी थारा दिला नाही. आता मात्र सध्याच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःची आमदारकी सुरक्षित ठेवून, घरातच उमेदवारी देण्यात धन्यता मानली आहे. खटाव गटात कॉन्ट्रॅक्टर्स तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी अशी अवस्था झाली आहे. खटाव, पुसेगावसह गावोगावी बुद्धिभेदाचे राजकारण केले जात आहे. दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये रक्ताचे पाणी करून सहकार्य केलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर वरवंटा फिरवण्यात आला आहे. मला पद किंवा सत्तेसाठी राजकारण करायचे नाही. सामाजिक आणि शैक्षणिक विकासाची  परंपरा जपायची आहे. त्यासाठी खटाव गटातील, तसेच पुसेगाव गणातील जनता आशीर्वादरूपी पाठबळ उभे करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला."

अशोकराव कुदळे म्हणाले, "खटावच्या लोकप्रतिनिधींच्या अनागोंदी कारभारामुळेच राहुल पाटील यांच्यासारखा मोठा वारसा असणारा आणि जनतेची तळमळीने सेवा करणारा कार्यकर्ता बाजूला झाला. राहुल पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी खटाव गटातील जनता सज्ज झाली आहे."

हुकूमशाही रोखण्यासाठी एकत्र -सध्या सुरू असलेली हुकूमशाही रोखण्यासाठी आणि लोकशाही

टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एक सुशिक्षित, सर्वगुणसंपन्न आणि वारसा असणारे राहुल पाटील यांचे तरुण आश्वासक नेतृत्व आम्ही खटाव गटातून उभे केले आहे. खटावचे सरपंच, उपसरपंचपद दहा वर्षे भूषविलेले अनुभवी आणि सामाजिक बांधिलकी असलेले मुगुटराव पवार खटाव गणातून उभे आहेत. राजकीय आणि सामाजिक वारसा असणाऱ्या गौरव जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव पुसेगाव गणातून उभ्या आहेत. या सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी वाढत असलेला जनतेचा पाठिंबा खटाव गटाचे वारे बदलणार असल्याचा संकेत देत आहे, असे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी सांगितले.