Ticker

6/recent/ticker-posts

खटाव जिल्हा परिषद गट वार्तापत्र लढत तुल्यबळ उमेदवारांना हत्तीचे बळ! आजी , माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला ! कोण मारणार बाजी ?

 




  बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

 गेली आठ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका म्हणजे विधिमंडळाची पायरी म्हणून पाहिले जाते. जिल्ह्यातील कित्येक लोकप्रतिनिधीची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जिंकल्यानंतरच विधानसभेची वाट सोपी झाली आहे असे दिसून येते. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीकडे स्थानिक कार्यकर्ते अतिशय गंभीरपणे पाहतात. अशावेळी समोरील उमेदवार जर मातब्बर असेल तर विरोधातही मातब्बर उमेदवार दिला जातो त्यामुळे लढत तुल्यवळ होते. त्यामुळे वर्तमानात सामान्य मतदारांची च‌ंगळ होताना दिसत असली तरी लोकशाहीची विटंबना होत चालली आहे हे दुर्दैवाने नमूद करावे लागेल.

 *आमदार सेनेचा उमेदवार भाजपाचा*

 आज-काल घराणेशाहीवर टीका करणारे प्रत्येक राजकीय पक्षात भेटतील परंतु प्रत्येक राजकीय पक्षात घराणे शाही ओघाने चालत आलेली आहे हे प्रकर्षाने जाणवते. परंतु खटाव जिल्हा परिषद गटात घराणेशाहीचा एक वेगळाच नमुना जनतेसमोर आला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खटाव जिल्हा परिषद गटात विद्यमान लोकप्रतिनिधी श्री महेश शिंदे यांच्या पत्नी सौ. प्रिया महेश शिंदे हे आपले नशीब आजमावत आहेत. परंतु त्यांचे पती श्री महेश शिंदे हे शिवसेनेचे आमदार असले तरी सौ प्रिया शिंदे या भाजपा पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. असा हा दुर्मिळ राजकीय युतीचा योग खटाव जिल्हा परिषद गटात पहावयास मिळत आहे.

   ज्याप्रमाणे विद्यमान आमदार यांच्या पत्नी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी त्यांच्या विरोधात माजी आमदार चंद्रहार पाटील यांचे नातू व माजी आमदार श्री. प्रभाकर घार्गे यांचे जावई श्री राहुल पाटील विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तुल्यबळ लढत होणार असे दिसते.

 *आधी एकत्र आता विरोधात*

 गेली अनेक वर्षे विद्यमान आमदार श्री महेश शिंदे व राहुल पाटील हे एकत्र काम करताना संपूर्ण विधानसभा मतदारसंघाला माहित आहे. परंतु गेली तीन महिने झाले आमदार श्री महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती या मतदारसंघात दारोदारी जाऊन त्यांच्या विकासाचे व्हिजन लोकांना सांगत आहेत, यामुळे गेली पाच वर्षे तयारी करत असलेले श्री राहुल पाटील हे विद्यमान आमदार यांच्या विरोधात स्वाभिमानाची लढाई म्हणून निवडणूक लढवत आहेत. श्री राहुल पाटील यांच्याबरोबर युवकांचे जोरदार संघटन या लढाईत उतरले आहे. त्यामुळे या मतदारसंघात काटे की टक्कर होणार असे दिसत आहे.

        काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांचे बारामती जवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. पवार कुटुंबावर सातारा जिल्ह्याने भरपूर प्रेम केले आहे. त्यातच अजित पवार हे कामाची व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या नावलौकिकाचा फायदा कित्येकांना भेटला आहे. श्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती भेटेल असा कयास राजकीय पंडितांना वाटत आहे आणि तसा फरक ही जनमानसात दिसत आहे. परंतु आ.श्री महेश शिंदे यांच्यावर गेली तीन ते चार निवडणुकीमध्ये सातत्याने विजयाचा गुलाल पडत असल्यामुळे ही लढत तुल्यबळ आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेत 

स्वतंत्र नेतृत्व पूर्ण क्षमतेनं तयार होत असतं. त्याला वेळही तेवढाच लागतो. त्याला त्याच्या त्याच्या क्षमतांची पूर्ण जाणीव असते. तो काय करू शकतो वा शकेल? हे त्याला पूर्णपणे ज्ञात असतं. जर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली तर या काळात तोडीस तोड असा कुणीही नसावा. याचा खेद वाटतो. मग कोण? लोक पर्याय वा नेतृत्व शोधतात वा देतातही. यावेळी ची निवडणूक सर्व अर्थाने खटाव तालुक्याला नवीन नेतृत्व देणारी आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजयी होणारा उमेदवार खटाव तालुक्याचे भावी नेतृत्वाची माळ आपोआप गळ्यात पडणार आहे त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये हत्तीचे बळ आले आहे आहे.