प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान मुंगसाजी माऊली धामणगाव देव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यतिथीनिमित्त पायदळ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी वेणी गणेशपूर येथून प्रारंभ होऊन 24 फेब्रुवारी 2026 रोजी धामणगाव देव येथे पुण्यतिथी सोहळ्याने समारोप होणार आहे.
गेल्या 45 वर्षांपासून अखंडित सुरू असलेली ही पारंपरिक पालखी सोहळा यंदाही पालखीचे अध्यक्ष सोमेश्वर भाऊ गभणे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गस्थ होत आहे. वेणी गणेशपूर व कनी मिर्झापूर येथील भाविक मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होत असून दरवर्षी सुमारे 250 ते 300 भाविक या पदयात्रेत सहभागी होतात.
वेणी ते धामणगाव देव हा सुमारे 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत पूर्ण केला जातो. या मार्गामध्ये सालोट, शिवरा, ब्राह्मणवाडा, पांढरी, लोई, बोधेगाव, कोहळा व धामणगाव आदी गावांमधील भाविक मंडळींचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून वारकऱ्यांचे स्वागत व सेवा करण्यात येते.
पारंपरिक व भावनिक नात्याने जोडलेला हा सोहळा ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि उत्साहात शांततेत पार पडतो. पुण्यतिथी निमित्त धामणगाव देव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या पवित्र पदयात्रेमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.





Social Plugin