ललगुणच्या सुपुत्राची उल्लेखनीय कामगिरी
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे]
खटाव तालुक्यातील ललगुण येथील स्वराज सुधीर घाडगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत तालुका कृषी अधिकारी (राजपत्रित अधिकारी गट-ब) पदासाठी निवड मिळवली आहे. सन २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी महाराष्ट्रातून १०३ वी रँक मिळवून हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे ललगुण गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
स्वराज घाडगे यांचे प्राथमिक जिल्हा परिषद शाळा ललगुण व माध्यमिक शिक्षण श्री सेवागिरी विद्यालय, पुसेगाव तसेच सरस्वती विद्यालय, कोरेगाव येथे झाले. शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी अभ्यासात सातत्य आणि चिकाटी जपली. पुढे त्यांनी कृषी क्षेत्रात पदविका शिक्षण कृषी महाविद्यालय, कराड येथून पूर्ण केले तसेच बी.एस्सी. (ॲग्री) पदवी संपादन केली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी पुणे येथे राहून अभ्यासिकेत नियमित व नियोजनबद्ध अभ्यास केला. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कठीण परीक्षेत यश संपादन करत आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
स्वराज यांच्या या यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती कैलास घाडगे, ललगुण विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन प्रवीण घाडगे, हणमंतराव शिंदे, अमोल घाडगे, विनोद घाडगे तसेच ललगुण ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. अनेकांनी त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला.
स्वराज घाडगे यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही लक्ष्य गाठता येते, याचा त्यांनी प्रत्यय घडवून दिला आहे.





Social Plugin