Ticker

6/recent/ticker-posts

नागपूरच्या उमरेड मोहपा रोडवर घडली दुर्दैवी घटना.

 

बारावीचा परीक्षेला निघालेल्या मुली व वडिलांचा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू.

भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण न्यूज

उमरेड - १२वीची परीक्षा देण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या विद्यार्थिनीचा आणि तिच्या वडिलांचा मोहपा रोडवरील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली. उमरेड पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत आणखी एक विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

: पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहपा गावातील सुभाष केशव भिवणकर (वय ५२) हे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या दुचाकीने मुलगी तन्वी सुभाष भिवणकर (वय १६) आणि तिची मैत्रीण वंशिका ज्ञानेश्वर नरुळे (वय १७) यांना घेऊन उमरेडकडे निघाले होते. दोन्ही विद्यार्थिनींची बारावीची परीक्षा असल्याने त्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी घरातून लवकर निघाल्या होत्या. मात्र नियतीने वेगळाच घात केला.

 एमआयडीसी पुलाजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे येणाऱ्या गिट्टीने भरलेल्या ट्रकने (क्रमांक MH-40/BG-7750) दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी अक्षरशः चिरडली गेली. या अपघातात सुभाष भिवणकर आणि तन्वी भिवणकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वंशिका नरुळे ही गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १२वीच्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने मोहपा गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालक प्रफुल दशरथ भोयर (वय २७) याला पकडून मारहाण केली. तसेच ट्रकच्या केबिनला आग लावण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने उमरेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले.