Ticker

6/recent/ticker-posts

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी उत्साहात साजरी.




(वाशिम जिल्हा प्रतिनिधी: श्री.ओंकार पुरी)

स्थानिक उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतिदिन (आत्मार्पण दिन) अत्यंत उत्साहात आणि आदराने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्तीचा आणि त्यांच्या प्रखर विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पी. के. नंदेश्वर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. ए. जी. वानखडे यांनी विद्यार्थ्यांना सावरकरांच्या जीवनप्रवासावर मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. वानखडे यांनी आपल्या भाषणात सावरकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांचे अद्वितीय साहित्यिक योगदान आणि अंदमानातील त्यांचा खडतर संघर्ष यावर प्रकाश टाकला. सावरकरांचे विचार आजही तरुणांसाठी कसे प्रेरणादायी आहेत, हे त्यांनी विविध उदाहरणांसह पटवून दिले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. पी. के. नंदेश्वर यांनी सावरकरांच्या केवळ राजकीय कार्याचाच नव्हे, तर त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि समाजसुधारणेच्या कार्याचाही विशेष उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित जोपासण्याचे आवाहन करत त्यांनी सावरकरांच्या दूरदृष्टीची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. टीकार यांनी केले, तर व्यासपीठावर प्रा. जयंत मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन इतिहास विभाग प्रमुख प्रा. किरण बुधवंत यांनी केले. यावेळी डॉ. नरवाडे, डॉ. काळे मॅडम, प्रा. मनवर, प्रा. संदीप जुनघरे, प्रा. निलेश बाजड, प्रा. पाठक मॅडम, प्रा. राम जुनघरे, प्रा. बोंडे मॅडम, प्रा. लाहोरे, प्रा. वाघ, श्री ओंकार पूरी, श्री संतोष घुगे, श्री गोपाल कोल्हे, प्रा. प्रजापती, श्रीमती भोसले आणि श्रीमती नरवाडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रा. एम. पी. खेडेकर मॅडम यांनी आभार मानून केला.