Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव खंडेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी १९ मुद्द्यांचे निवेदन आगामी सर्वसाधारण सभेत विषय समाविष्ट करण्याची मागणी



प्रतिनिधी- गौरव ब्राम्हणवाडे 

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत अनेक वर्षांनंतर लोकांनी निवडून दिलेली लोकप्रतिनिधींची सत्ता स्थापन झाली असून, शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत अविनाश सदाशिवराव ब्राह्मणवाडे यांनी नगराध्यक्षांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

नगराध्यक्षांना दिनांक ०२/०२/२०२६ रोजी पाठवलेल्या पत्रानुसार येणाऱ्या सर्वसाधारण सभेत शहर विकासाशी संबंधित महत्त्वाचे विषय समाविष्ट करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. जनतेने विकासासाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले असून, त्या विश्वासास पात्र ठरावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनामध्ये शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षितता, अतिक्रमण, समाजभवन, स्मशानभूमी, रस्ते, स्ट्रीट लाईट, कॅमेरे आदी एकूण १९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. बस स्टँड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणे व व्यापारी संकुलाची निर्मिती, जलकुंभ सुरू करणे, शहर डुक्करमुक्त करणे, उघड्या विहिरींवर जाळी व रेलिंग बसवणे, तसेच विविध प्रभागांमध्ये स्ट्रीट लाईट व साफसफाईची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, गवारी समाजभवनाचे काम सुरू करणे, अतिक्रमण हटवणे, कचरा डेपो स्थलांतरित करणे, वॉटर एटीएम बसवणे, स्मशानभूमी विकास, रस्ते दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, नाना-नानी पार्क, पूल बांधकाम व मंजूर घरकुलांचे धनादेश त्वरित वाटप करण्याबाबतही ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.

शहराच्या स्वच्छ, सुरक्षित व सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीने या सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.