Ticker

6/recent/ticker-posts

जीएसटी’च्या नावे अडीच कोटी लाटले; बांधकाम व्यावसायिकास कायदेशीर सल्लागारांचा गंडा



नाशिक, प्रतिनिधी,

इन्कमटॅक्स व जीएसटी’ भरण्याच्या नावाखाली बनावट आयडी व पासवर्ड तयार करून परस्पर आर्थिक व्यवहार स्वतःच्या खात्यावर वळवून बांधकाम व्यावसायिकाची  तब्बल २ कोटी ४२ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांत संशयित कायदेशिर कर सल्लागार ज्ञानेश्वर कदम व त्यांची मुले ललित आणि शशांक कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी कैलास भाऊसाहेब कराळे (वय ६०, रा. गोविंदनगर, नाशिक) यांनी ‘धनंजय कन्स्ट्रक्शन’च्या वतीने फिर्याद दाखल केली आहे. त्यांची सन १९९७ मध्ये व्यवसायासंदर्भाने कान्हेरेवाडीतील शिवाजी गार्डनमागील दामोदर चेंबर्स येथील संशयित ज्ञानेश्वर कदम यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर कराळे यांनी कदम यांची कन्स्ट्रक्शनचे कायदेशिर सल्लागार म्हणून नेमणूक केली.दरम्यान, सन २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कदम यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये मुलगा ललीत व शशांक यांची ओळख कराळे यांना करवून दिली. दोघेही आयकर व जीएसटीचे  कामकाज पाहतात व ते ‘सीए’ असल्याचे भासविले.

यानंतर कराळे यांचे व कंपनीचे कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच, कराळे यांनी वेळोवेळी शशांक व ललीतच्या बँक खात्यावर कोट्यवधी रुपये जमा केले. यानंतर, जीएसटी नंबर रजिस्टर करतांना ललितने स्वतः आयडी व पासवर्ड बनविला. कराळेंच्या मोबाईलवर जाणारे ओटीपी विचारुन घेतले. काम सुरळीत सुरु असल्याचे कराळे यांनी दुर्लक्ष केले. मात्र, कालांतराने जीएसटी व आयकर भरल्याच्या पावत्या कराळे यांनी मागितल्या. तेव्हा त्यांनी दिल्या नाहीत. आयडी व पासवर्ड देण्यासही टाळाटाळ केली.

जीएसटी कार्यालयाने उघड केला घोळ

व्यवहारांचा संशय आल्याने कराळे पाथर्डी फाटा येथील जीएसटी भवनात पोहोचले. तेथील अधिकाऱ्यांनी खाते तपासले असता धनंजय कन्स्ट्रक्शनचे सन २०१९ पासून फक्त एक ते सव्वा कोटी रुपयेच जीएसटी रक्कम भरली आहे व एक कोटी २४ लाख रुपये भरलेच नसल्याचे सांगितले. यानंतर जीएसटी अधिकाऱ्याने थकीत रक्कम तसेच त्याचा दंड व व्याज असे एकूण दोन कोटी ४२ लाख, साठ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे ललित व शशांक यांनी फसविल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिस ठाणे गाठले.

सीए नाहीत, फक्त सल्लागार….

कराळे यांनी दोघांकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम स्वतः साठी वापरल्याचे कबूल केले. तसेच रक्कम भरतो असे आश्वस्थ केले. मात्र, त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे सन २०१९ पासून ‘धनंजय कन्स्ट्रशन’ चा जीएसटी व आयकर भरण्यासाठी संशयितांनी वेळोवेळी २ कोटी २५ लाख रुपये स्वीकारुन केवळ एक कोटी २४ लाख रुपये स्वतःच्या फायद्याकरीता वापरून वरील रक्कम व त्याचे व्याज आणि दंड मिळून दोन कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहेत.