प्रतिनिधी- गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर :
नांदगाव खंडेश्वर शहरातील अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकुल करून त्यांना नमुना ८-अ (पट्टा) तसेच शासकीय घरकुल योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांना निवेदन देण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष मंगेश पांडुरंग देवळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, शहरातील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असतानाही त्यांच्या ताब्यातील जागेवर अद्याप मालकी हक्काचा कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर शासकीय घरकुल योजनांचा लाभ घेता येत नाही.
यापूर्वी अतिक्रमण नियमानुकुलीकरणाच्या दृष्टीने जागांची मोजणी करण्यात आली होती. मात्र नगरपंचायत कार्यालय, नांदगाव खंडेश्वर यांनी अद्याप अतिक्रमण नियमानुकुलीकरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, अमरावती यांच्याकडे सादर केलेला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या २०२५ च्या नवीन शासन निर्णयानुसार सन २०२१ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकुल करता येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना या निर्णयाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, २०२५ च्या शासन निर्णयानुसार नांदगाव खंडेश्वर शहरातील अतिक्रमण नियमानुकुलीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नगरपंचायत कार्यालयाने प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी, अमरावती यांच्याकडे त्वरित सादर करावा, असे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार प्रतापदादा अडसड यांच्याकडे करण्यात आली.या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना पाठविण्यात आली आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नगरसेवक वैभव कोंडवते, मंगेश देवळे, आशिष खंडार, कैलास चांदणे, बाळू देशमुख आदी उपस्थित होते.





Social Plugin