Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था; उत्तर खटावमधील नागरिकांची दुरुस्तीची मागणी‎.



बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

  सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील नेर फाटा ते ललगुण आणि पुसेगाव-फलटण राज्य महामार्गावरील नेर फाटा ते नेर या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. उत्तर खटावच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि रुंदीकरण होणे गरजेचे झाले आहे.

नेर फाटा ते ललगुण या रस्त्यावरून नेर, फडतरवाडी, पवारवाडी, नेर तलाव, नागनाथवाडी, ललगुण परिसरातील शेतमालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या गावांतील प्रवासी वाहतुकीसोबत ललगुण, डिस्कळ, मोळमार्गे फलटणकडे तर नेर ते नेरफाटा या रस्त्यावरून राजापूर, कुळकजाई, मलवडी मार्गे दहिवडीकडे प्रवासी वाहतूक होते. तसेच या भागातील विद्यार्थी, नोकरदार या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर दररोज वापर करतात.

वर्दळ जास्त असली तरी या रस्त्यांची रुंदी कमी आहे. त्यामुळे दोन अवजड वाहने एकमेकांना क्रॉस होताना अडचणी निर्माण होताना. अनेकदा ओव्हरटेक किंवा पास होताना एका वाहनाला डांबरावरून खाली उतरावे लागते. अशावेळी वाहनाची गती जास्त असल्यास अपघाताची शक्यता बळावते. अशी अपघाती परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे झाले आहे.

दरम्यान, या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडा खराब झाल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अनेक ठिकाणी डांबर गायब झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड होत असून अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 


नेर, फडतरवाडी (नेर), रणसिंगवाडी, राजापूर, फडतरवाडी (बुध) या भागांतून फलटण-पुसेगाव राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते खराब झाले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यांवरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांतून होत आहे.

लोकांच्या आकर्षणाचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येत असलेला ब्रिटिशकालीन नेर तलाव, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गुरुपरंपरेतील महान संत व तपस्वी प. पू. श्री राघवचैतन्य महाराजांची समाधी मंदिर आणि प्राचीन श्री नागनाथ महाराज मंदिर ही स्थळे नेर फाटा ते ललगुण या मार्गावर असल्याने अनेक पर्यटक आणि भाविक येथून दररोज प्रवास करतात. या भागाच्या पर्यटन वृद्धीसाठी या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. -सचिन पवार, ग्रामस्थ नेर.


फलटण-पुसेगाव रोड वरून नेर फाटा ते नेर गावठाण मार्गे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब झाला असून खड्डे बुजवणे इतपत सुद्धा रस्त्याची अवस्था राहिला नाही. त्यामुळे हा रस्ता तत्काळ नव्याने करण्यात यावा.-सुरेश चव्हाण, माजी सरपंच नेर.