Ticker

6/recent/ticker-posts

अन् माजी खासदार सोमय्यांचा पारा चढला; थेट पत्रकारांवरच भडकले, नेमकं काय म्हणाले?



नाशिक, प्रतिनिधी,अमन शेख,

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल नाशिक महापालिकेच्या जन्मनोंदी ऑनलाईन करताना तब्बल १८ हजार नोंदी संशयास्पदरीत्या घुसवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला. तसेच तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बनावट जन्म दाखल्याप्रकरणी तत्काळ चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या काही प्रश्नांवर सोमय्या भडकल्याचे बघायला मिळाले.

मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरीवाले असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. त्यावर पत्रकारांनी गृह विभागाकडे ही माहिती नाही का? आजवर किती बांगलादेशी नागरिक परत पाठविण्यात आले? तुम्ही देत असलेली माहिती मुंबई पोलिसांकडे नाही का? अशी विचारणा केली. यावर उत्तर देतांना माजी खासदार सोमय्या यांनी “तुमचा काही ठराविक अजेंडा आहे का? असा प्रतिप्रश्न करत पत्रकारांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गेल्या ११ वर्षांत किती अनधिकृत बांगलादेशींना देशाबाहेर काढण्यात आले, याचा अधिकृत आकडा विचारल्यावर सोमय्यांची अस्वस्थता अधिकच वाढली, या गोंधळातच त्यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात दिलेला आश्रय हा परराष्ट्र धोरणाचा भाग असल्याचा दावा केला. मात्र, सततच्या प्रश्नांमुळे वैतागलेल्या सोमय्यांनी मला जाणीवपूर्वक केले जात आहे असे म्हणत पत्रकार परिषद अचानक संपवली. पत्रकार परिषदेत प्रश्नांचे समर्पक उत्तर न देता त्यांनी उलट पत्रकारांवरच नाराजी व्यक्त करत वातावरण तापवले, यामुळे महापौरांसह उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले होते.