मन्सूर शहा. धोत्रा. भंनगोजी . चिखली.:---
श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी वनस्पतीशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून इको-फ्रेंडली कलर्स प्रीप्रेशन वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान माननीय प्राचार्य डॉ. पी. आर. पडोळे सर यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी रासायनिक रंगांमुळे होणारे पर्यावरणीय व आरोग्यविषयक दुष्परिणाम स्पष्ट करून, नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यशाळेत बी . एस्सी.भाग १,२ व ३ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे इको-फ्रेंडली होळीचे रंग कसे तयार करावेत याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विविध वनस्पतीजन्य स्रोतांपासून रंग तयार केले. यामध्ये पळसाची फुले, बीट, हळद व पालक यांचा वापर करून लाल, गुलाबी, पिवळा व हिरवा असे विविध रंग तयार करण्यात आले. रंगांच्या बेससाठी कॉर्नफ्लोअर चा वापर करण्यात आला असून, रंगांना सौम्य सुगंध मिळावा यासाठी वनस्पती पासून बनवलेले परफ्यूम देखील मिसळण्यात आले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेले इको-फ्रेंडली रंगांचे नमुने माननीय प्राचार्य सरांना भेट म्हणून देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आव्हान केले व इको-फ्रेंडली रंगांचे नमुने वाटप करून जनजागृती केली.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या आयक्युएसी समन्वयक तसेच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. यू. पोच्छी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एम. डी. कोलते, प्रा. डी. एल. गावंडे, प्रा. एस. ए. काकडे, डॉ. एस. एम. वाघारे व श्री ए. पी. मोहोड यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची जाणीव निर्माण करण्यात हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरला.





Social Plugin