Ticker

6/recent/ticker-posts

भेंडा येथे हनुमान जन्मोत्सव महोत्सवाची भव्य तयारी.



संतोष फुलारी ग्रामीण प्रतिनिधी भेंडा बु //

 

भेंडा येथील श्रीक्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

या महोत्सवाच्या नियोजन बैठकीत श्रीराम सेवक बाबूसाहेब नजन यांनी माहिती देताना सांगितले की, श्रीसंत नागेबाबांच्या पावन भूमीत महंत भास्करगिरी महाराज, मीराबाई महाराज मिरिकर, महंत सुनीलगिरी महाराज यांच्या प्रेरणेने दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दि. २९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महंत रमेशानंदगिरी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत अनंत महाराज तांबरे यांचे कीर्तन होईल. दि. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता प्रकाशानंदगिरी महाराज यांची सदिच्छा भेट होणार असून सायंकाळी ७ ते ९ या वेळेत निलेश महाराज वाणी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

तसेच १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत वेदांताचार्य देविदास महाराज इंदोरे यांचे कीर्तन होणार असून २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी ५ वाजता ज्ञानेश्वर सागर रखवाले यांच्या हस्ते श्रींचा सूर्योदय पंचामृत महाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता महंत बालयोगी अमोल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल.

दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा पठण व रामनाम जप असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

या महोत्सवासाठी कुंडलिक महाराज गोरे, गणेश महाराज चौधरी, शिवाजी फुलारी, भाऊसाहेब फुलारी, वासिमक लिंगायत, विश्वास कोकणे, डॉ. रजनीकांत गुंड, राम गरुड, राजू तावरे, श्रीकांत शिंदे, तात्या फुलमाळी, अशोक लोखंडे, देवेंद्र काळे, बंडू आंदुरे, चांगदेव जगताप, रमेश मिसाळ आदींसह अनेक भाविकांनी परिश्रम घेतले आहेत.

हनुमान भक्तांसाठी हा महोत्सव आध्यात्मिक उर्जा देणारा ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.