हजारो रुपयांचा दिखाऊ खर्च टाळून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य; शहरात दातृत्वाची प्रेरणा
डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड (प्रतिनिधी)
वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो रुपये खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत असताना कारंजा शहरातील सेवाभावी डॉक्टर डॉ. अजय कांत यांनी समाजापुढे आदर्श ठेवत आपल्या वाढदिवसानिमित्त ‘सास’ संस्थेला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यांच्या या कृतीमुळे शहरात सामाजिक उत्तरदायित्व आणि दातृत्वाची भावना अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या २० ते २२ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अविरत सेवा देणारी ‘सास’ संस्था तालुका व जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. शून्यातून केवळ सेवाभावनेतून सुरू झालेल्या या संस्थेच्या कार्याला समाजातील अनेक सेवाभावी व्यक्तींचे सहकार्य लाभत आहे.
आरोग्य सेवा देताना अनेक रुग्णांसाठी देवदूत ठरलेले डॉ. अजय कांत यांच्या या मदतीमुळे संस्थेच्या सेवाकार्यास अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
संस्थेचे प्रमुख श्याम सवाई यांनी सांगितले की, सुमारे २२ वर्षांपूर्वी पत्रकार बंडूभाऊ इंगोले व श्याम सवाई यांच्या झालेल्या एका अपघातानंतर जखमींना वेळेवर मदत मिळत नसल्याची जाणीव झाली आणि त्यातूनच ‘सास’ संस्थेची निर्मिती झाली. तेव्हापासून संस्था सातत्याने आपत्कालीन मदत व आरोग्य सेवेत सक्रिय आहे.
डॉ. कांत यांच्यासारख्या सेवाभावी व्यक्तींचे सहकार्य संस्थेसाठी प्रेरणादायी असून समाजातील दात्यांनीही अशा सेवाभावी कार्याला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन यावेळी श्याम सवाई यांनी केले.





Social Plugin