डॉ.यशवंत पवार @9/03/2026
कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर
'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह (IPS अधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत सितानाईक तांडा ता. कन्नड येथे यशस्वी महिला व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांचे हस्ते नाशिकवरून श्रीमती स्मिता वाघ, पुण्यावरून सहा. प्राध्यापक शितल सोनवणे,निकिता राठोड (औषधनिर्माण अधिकारी, उस्मानाबाद) सरोदा राठोड (म. पोलीस, चाळीसगाव) तसेच तांड्यातील यशस्वी तरुणींचा सन्मान करण्यात आला.
८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ त्रिमुखसिंह सामाजिक संस्था आणि मा. सरपंच केशव राठोड यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत सितानाईक तांडा येथे, यशस्वी महिलांचा आणि उच्चशिक्षित गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व विशेष सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला... यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह (IPS अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. त्यांनी तांड्यातील मुलींना व महिलांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र ही विरांगणाची भूमी आहे. आपल्या देशातल्या महिला 'अबला' नसून त्या 'सबला' आहेत. त्यामुळे याच भूमीवर शूर, पराक्रमी, धाडसी महिलांनी इतिहास घडवला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्या राजमाता जिजाऊ, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक, मेरी कोम, अंतराळवीर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स अशा कित्येक विरंगनाची नावे सांगता येतील. स्त्रीमध्ये सृष्टी निर्माण करण्याची शक्ती निसर्गाने दिली आहे. ही सृष्टी घडवण्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा हा महिलांचा आहे. आज कायद्याने स्त्रियांना समानता मिळालेली आहे. परंतु पूर्वी पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांना दुय्यम स्थान दिल्या गेले त्यांना 'अबला' समजल्या गेले. गाव खेड्यामध्ये आणि काही प्रमाणात शहरांमध्ये सुद्धा अजूनही 'चूल आणि मूल एवढेच तिचे काम' असे समजून ती पुरुषावर अवलंबून आहे. परंतु तिला जर आई-वडिल, सासू सासऱ्यांचा, नवऱ्याचा पारिवारिक आधार मिळाला तर ती आजही स्वावलंबी आणि सक्षम बनू शकते.. आज-काल गाव खेड्यांमध्ये निरक्षरतेमुळे आणि योग्य ते समुपदेशन न मिळाल्यामुळे मुला-मुलींचे पळून जाण्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. ह्या घटना सांस्कृतिक दृष्ट्या फार गंभीर आहेत. त्यामुळे आपण पालकांनी संवेदनशीलतेने आपल्या पाल्यांना संस्कार देणे ही काळाची गरज बनली आहे. ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन (IWD), दरवर्षी साजरा केला जातो म्हणजे लैंगिक समानतेचा विचार करताना महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीची ओळख करून देणारा हा जागतिक दिवस आहे. ज्यांनी माझा पाठलाग करून मला इथे बोलावले. ते त्रिमुखसिंह सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी तरुणांनीच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुलींना/महिलांना या कार्यक्रमातून प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन मुद्दामहून ग्रामीण भागात केले आहे. आजची तरुण पिढी चांगल्या कामासाठी पुढे येत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे खऱ्या अर्थाने स्त्रियांना समानतेची वागणूक मिळेल आणि त्यांचेही कार्य उज्वल होईल यात काही शंका नाही. आपण सर्वांनी महापुरुषांच्या जीवनकार्याची प्रेरणा घेतल्यास चांगले दिवस फार दूर नाही. जाता जाता IPS अधिकारी अन्नपूर्णा सिंह म्हणाल्या इतक्या लांबून आले पण आपल्याला भेटून आनंद वाटला. माझ्या स्वागतासाठी पारंपरिक नृत्याचे आयोजन पाहून दुरून आल्याचे सार्थक झाले. असे गौरवोद्गार अन्नपूर्णा सिंह यांनी काढले. यावेळी मा. सरपंच केशव राठोड, संस्थेचे अध्यक्ष राहुल राठोड, सचिव केदार कुलकर्णी, कार्यक्रमाचे निमंत्रक, सूत्रसंचालक प्रा. केशरचंद राठोड व सुप्रसिद्ध गायक पि. के. राठोड, नाशिकवरून ॲड. चंद्रकांत वाघ, श्रीमती स्मिता वाघ, पुण्यावरून सहा. प्राध्यापक शितल सोनवणे, सरोदा राठोड (म. पोलीस) निकिता राठोड ( औषधनिर्माण अधिकारी, उस्मानाबाद) ॲड. सौरभ औटे, एकनाथ मानवतकर, सचिन इघारे सागर निकम आणि विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशस्वी महिला आदी पाहुण्यांसोबत सितानाईक तांड्यातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin