Ticker

6/recent/ticker-posts

तीन एकरांतील २२०० सीताफळ झाडे आगीत खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

खटाव येथील शेतकरी मोहन घाडगे यांची धारपुडी शिवारात असलेली तीन एकरांवरील सीताफळाची बाग भीषण आगीत जळून खाक झाली. सुमारे २२०० झाडांची, पाच वर्षांच्या कष्टातून उभी राहिलेली ही बाग काही क्षणांत भस्मसात झाली. कष्टांची बाग जळून खाक झाल्याने घाडगे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.यावेळी आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना शेतकरी मोहन घाडगे यांचा पाय आगीत भाजून ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

     पाच वर्षांपूर्वी दुष्काळसदृश्य परिस्थितीत घाडगे यांनी ही बाग लहान लेकराप्रमाणे जपली होती. एका झाडाच्या संगोपनासाठी जवळपास दोन हजार रुपये खर्च आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

     घटनेची माहिती मिळताच कृषी अधिकारी अमोल चोरमले आणि तलाठी राजेंद्र कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. कष्टाने फुलवलेली बाग राखेत परिवर्तित झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. बाधित शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

छायाचित्र -

धारपुडी: मोहन घाडगे यांची हिरवीगार बाग आगीत उध्वस्त झाली. ( छाया - प्रकाश राजेघाटगे )