कलमेश्वर (प्रतिनिधी):
तालुक्यातील निमजी गावात आज एका तरुण शेतकऱ्याने (किंवा तरुणाने) राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिषेक रामचंद्र दिवाण (वय २८ वर्षे) असे मृत तरुणाचेनाव असून, या घटनेमुळे निमजी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिषेकने आज अज्ञात कारणातून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच गावात एकच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते मंगेशभाऊ गमे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले. अभिषेकला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कलमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अभिषेकने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. एका तरुण मुलाच्या अशा जाण्याने दिवाण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.




Social Plugin