Ticker

6/recent/ticker-posts

एमआयटी एडीटी कॅम्पसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; तरुणीचा छळ करणाऱ्याला वडिलांकडून चोप.




पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) विद्यापीठाच्या आवारात आज एक धक्कादायक प्रकार घडला. गेल्या १५ दिवसांपासून एका तरुणीचा ऑनलाइन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला मुलीच्या वडिलांनी कॅम्पसमध्ये गाठून रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये मोठा गोंधळ उडाला असून विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीला एक तरुण गेल्या पंधरा दिवसांपासून ऑनलाइन माध्यमातून त्रास देत होता. या प्रकारामुळे पीडित तरुणी प्रचंड मानसिक तणावात होती. तिने ही बाब आपल्या वडिलांच्या कानावर घातली होती. आज जेव्हा तो विद्यार्थी पुन्हा कॅम्पसमध्ये आला, तेव्हा तरुणीच्या वडिलांनी त्याला प्रत्यक्ष गाठून जाब विचारला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर झटापटीत झाले.

​प्रशासनाचा ढिम्म कारभार चर्चेत

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, पीडित कुटुंबाने यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. "विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रशासन नक्की कोणत्या घटनेची वाट पाहत आहे?" असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत. बाहेरील कॉलेजचा विद्यार्थी कॅम्पसमध्ये बिनधास्त येऊन छेडछाड कशी करतो, यावरून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

​या प्रकारानंतर आता विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेते आणि पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.