भक्ती जाधवची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
डॉ.यशवंत पवार @18/03/2026
कन्नड,जि.छत्रपती संभाजीनगर
जवाहर नवोदय विद्यालयाकडून घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पिरीक्षेचा निकाल दिनांक १७ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेत कन्नड शहरातील माळीवाडा परिसरातील कु. भक्ती रवींद्र जाधव हिने १०० पैकी ९५ गुण घेत निवड यादीत स्थान मिळवत इयत्ता ६ वी पासून पुढील शिक्षणासाठी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे.
तिला सूर्यवंशी सर, अंकुश जाधव, सरदारसर आणि तिचे वडील रवींद्र जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. रविंद्र जाधव हे स्वतः शिक्षक असताना त्यांनी आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमा ऐवजी मराठी शाळेत प्रवेश देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली आहे.
श्री.रामचंद्र प्राथमिक विद्यालयात कु. भक्ती जाधव व तिच्या पालकांचा सत्कार सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. शंकरराव काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. शंकरराव काळे यांनी सांगितले की, मराठी माध्यमांच्या शाळे मधील शिक्षण इंग्रजी माध्यमा पेक्षा उत्तम दर्जाचे आहे. गुरुजणांचे मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य, प्रयत्न यातून यश संपादन करता येते. आज पालकांचा इंग्रजी शाळेकडे कल वाढतांना दिसत आहे. मराठी शाळेबद्द्ल न्यूनगंड न बाळगता आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे त्यातूनच भाषा संस्कृती विकसित होत असते. हे पालकांनी विचारात घ्यावे. मराठी शाळा बद्दलचा दृष्टीकोन बदलला हवा, असे ते म्हणाले.
यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. भक्तीच्या या यशाबद्दल तिचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.





Social Plugin