* तुम्हा मंडळींना पाटणकरांनी विधानसभेत तब्बल सहा वेळा धुळ चारली हे लक्षात ठेवा.
* मंत्री असतानाही जिल्हा बँकेत तुमचा मीच पराभव केला याचीही जाणीव ठेवा.
* स्वतःचच संरक्षण करू शकत नसाल तर पालकमंत्री म्हणून का रहाताय....?
पाटण ( प्रतिनिधी ) ना. शंभूराज देसाई तुम्हा मंडळींना विधानसभेत आजपर्यंत पाटणकरांनी तब्बल सहावेळा पराभवाची धूळ चारली, स्वतः मंत्री असतानाही जिल्हा बँकेत तुमचा सुपडा साफ केला. एवढेच नव्हे तर पाटण नगरपंचायतीत तुम्हाला व्हाइट वाॅश देत आजपर्यंतच्या इतिहासात अपवादात्मक कुबड्या व नशिबाची चिठ्ठी वगळता पंचायत समितीची सत्ता कायमच आमच्या ताब्यात राहिली असतानाही आम्ही सत्तेचा कधीही उन्माद केला नाही. सत्ता येते व जाते त्यामुळे विजयाने हुरळून आणि पराभवाने खचून जाणारे आम्ही नाही हे लक्षात ठेवा. केवळ नैराश्येतून भाजपासह आमच्यावर वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा जनतेचा कौल मान्य करून आपला स्वाभिमानी बाणा दाखवत मंत्री पदाचा राजीनामा द्या असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले मी पहिल्यांदा पंचायत समिती सभापती झालो त्यानंतर २००९ साली गेलेली आमदारकी तुमच्याकडून परत खेचून आणली हे तुम्ही सोयीस्करपणे विसरला आहात. जिल्हा परिषद व पाटण पंचायत समितीचा इतिहास तपासला तर गेल्या तीस वर्षांत अपवादात्मक नशिबाची चिठ्ठी व कुबड्या घेऊन तुम्ही मिळवलेले सभापती पद वगळता या सत्ता कायमच आम्ही बहुमताच्या जीवावर जिंकलेल्या आहेत. एवढ्या वर्षानंतर एकदा मिळालेल्या संख्याबळावर आपण हे दिवस कायमच राहतील अशा अपेक्षा बाळगू नका. २०२४ च्या विधानसभेला ज्या मताधिक्याने तुम्ही निवडून आला त्याच्यापेक्षा झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात तुमचे मताधिक्य व मतंही कमी झालेली आहेत हे तपासून पहा. त्यामुळे कुणी कुणाला नाकारलं या प्रश्नांमध्ये जाण्याची काही गरज नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पालकमंत्री असतानाही तुम्हाला पोलिसांनी अशी वागणूक दिली याचा जर खरच निषेध करायचा असेल तर स्वाभिमानाने मंत्री पदाचा राजीनामा देऊन आपला स्वाभिमान दाखवा. आपण राज्यात मुख्यमंत्र्यानंतर तिसऱ्या नंबरचे हेवीवेट मंत्री आहात असं कायमच भासवत होता तर विधान परिषदेत तुम्हाला स्वसंरक्षणार्थ सभापतींसमोर हात जोडून विनंती करण्याची वेळ का आली ? जर तुम्ही स्वतःचे संरक्षण करु शकत नसला तर मग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही सक्षम नाहीत हेच तुम्हीच स्पष्ट केले आहे. याबाबतच्या टिव्हीवरच्या बातम्या पाटण तालुकाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्र आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहात आहे, त्यामुळे तुमचा स्वाभिमान महत्त्वाचा की सत्ता हेदेखील यातून उघड झाल आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. मात्र या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आर्थिक आमिषे दाखवण्यात आली तर काही ठिकाणी मतदारांवर दबाव आणल्याच्या तक्रारी समोर आल्याने यातून हा विजय मिळवला असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही आणि याबाबत भविष्यात जनता योग्य निर्णय घेईल याचा ठाम विश्वास आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीवेळी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी तो दबाव झुगारून संविधानिक मार्गाचा अवलंब केला ही लोकशाहीसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र पराभव झाल्यानंतर त्याचे खापर पोलिसांवर फोडत जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्याविषयी विधानसभा सभागृहात एकेरी भाषा वापरून त्यांचे निलंबन करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली हे अत्यंत दुर्दैवी आहे. जे अधिकारी निःपक्षपातीपणे काम करतात त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव आणणे योग्य नाही. जर थेट विधानसभा सभागृहात अधिकाऱ्यांविषयी एकेरी भाषेत बोलले जात असेल तर सभागृहाबाहेर त्यांच्याशी कसे वागले जात असेल हे जनतेलाही माहिती आहेच. मागील काळात महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे करून घेण्याचे प्रकारही घडले आहेत त्यामुळे अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांना दडपशाहीच्या वातावरणात काम करावे लागले आहे. अशा अधिकाऱ्यांविषयी सहानुभूती बाळगणे गरजेचे आहे आणि त्यांनी निःपक्षपातीपणे काम करावे हीच अपेक्षा आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही मागे हटणार नसून प्रशासनावर दबाव टाकण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे. अधिकारी व पोलीस यंत्रणांनी निःपक्षपातीपणे काम केल्यासच लोकशाही बळकट होईल आणि योग्य वेळी जनताच अशांना सर्व प्रश्नांची चोख उत्तरे देईल.
शंभूराज देसाईंनी अलीकडे केलेल्या वक्तव्यांबाबत स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे की सार्वजनिक जीवनात व्यक्तीचे मूल्यमापन हे केवळ शब्दांवर नव्हे तर सातत्यपूर्ण कामगिरीवर आणि जनतेसाठी केलेल्या योगदानावर होत असते. निवडणुका या केवळ राजकीय स्पर्धा नसून त्या जनतेच्या विश्वासाचा आणि त्यांच्या अपेक्षांचा कौल असतात. जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी वक्तव्य करताना अधिक संयम, तथ्याधारित भूमिका आणि सार्वजनिक जीवनाला साजेशी शालीनता राखणे अपेक्षित असते. जर काही मतभेद किंवा प्रश्न असतील तर ते खुलेपणाने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडले जावेत. अप्रत्यक्ष आरोप, सूचक टीका किंवा राजकीय सोयीसाठी केलेले वक्तव्य हे लोकशाहीत सुदृढ चर्चेला पोषक ठरत नाहीत. आम्ही नेहमीच स्वच्छ, पारदर्शक आणि विकास केंद्रीत राजकारणावर भर दिला असून वैयक्तिक टीकेपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पायाभूत सुविधा, स्थानिक गरजा आणि जनहिताच्या कामात घेतलेला पुढाकार हीच आमच्या कार्यशैलीची साक्ष आहे. त्यामुळे आमच्या निष्ठा किंवा बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न हा केवळ दिशाभूल करणारा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिनिष्ठ आरोप, प्रत्यारोपात अडकण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर, विकासाच्या कामांवर आणि सन्मानजनक मूल्याधारित राजकारणावर ठामपणे लक्ष केंद्रित करत आलो आहोत. पाटणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमची बांधिलकी कायम आहे आणि तीच आमची खरी ओळख आहे.
जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीत लोकशाही पद्धतीने ज्या गोष्टी घडल्या त्या मान्य करण्याच्या ऐवजी त्याचं खापर पोलिसांवर फोडण्यापेक्षा त्यांनी केलेल्या निःपक्षपाती कार्यवाहीचे कौतुक झालं पाहिजे. केवळ सत्तेचा दबाव टाकून जर पोलिसांवर कारवाया होणार असतील तर मग राजकीय दबावापोटी झालेल्या त्यांच्या काळातील सर्व कारवायांची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाया करणे अशीही आमची मागणी असल्याचेही सत्यजितसिंह पाटणकर शेवटी म्हणाले.





Social Plugin