प्रतिनिधी ज्ञानेश्वर आडे
सध्या पावसाळा ऋतू सुरु असून निसर्गाने आपली भरभरून उधळण केली आहे. या ऋतूमुळे मराठवाड्यातील अनेक निसर्गस्थळे पुन्हा एकदा जीवनाने भरभरून वाहू लागली आहेत. त्यामध्ये पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
पावसाचे मुबलक आगमन झाल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा तुडुंब भरून वाहत आहे. पाण्याचा प्रचंड वेग, झुळझुळाट आणि आजूबाजूचा हिरवागार निसर्ग पाहून प्रत्येकाचे मन प्रसन्न होत आहे. या धबधब्याच्या सौंदर्यात मन गुंतून जाते. विशेषतः श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर येथे पर्यटकांची आणि भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
धबधब्याजवळच वसलेले श्री महादेव मंदिर हे भाविकांसाठी एक श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि श्रावणाच्या विशेष दिवशी येथे दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भक्तगण श्रीमहादेवाचे दर्शन घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि समाधान झळकत असते.
श्रावण महिन्यामुळे येथे भक्ती आणि निसर्ग यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. काहीजण केवळ महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात, तर काही जण धबधब्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे उपस्थित राहतात. परंतु या दोन्हींच्या एकत्र अनुभवाने येथे येणारा प्रत्येक व्यक्ती समाधानाने परत जातो.
परोटी तांडा आणि परिसरातील ग्रामस्थांनीही भक्तांना आणि पर्यटकांना सहकार्य करण्याची तयारी ठेवली आहे. स्वच्छता, रस्ता व्यवस्था, आणि सुरक्षा याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
सहस्त्रकुंड आणि श्री महादेव मंदिर हे केवळ एक पर्यटनस्थळ किंवा धार्मिक स्थळ नसून, ते एक संवेदनशील आणि आध्यात्मिक अनुभवाचे ठिकाण बनले आहे.
|| हर हर महादेव ||
-





Social Plugin