प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर : घरगुती गॅसच्या वाढत्या किमती आणि निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व गृहिणींचे बजेट कोलमडले असल्याचा आरोप करत युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी नांदगाव खंडेश्वर येथे नाल्यालगत अनोखे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे नागरिकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना रोजगार सोडून गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “नरेंद्र सिलेंडर” अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
देशाच्या संरक्षणापासून ते नागरिकांच्या मूलभूत गरजांपर्यंत प्रत्येक आघाडीवर केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्यामुळे तेथील मालाला भारतात शुल्कमुक्त प्रवेश दिला जात असून भारतातील शेतमालावर अमेरिकेत ३० टक्के टॅरिफ लावले जात असल्याने शेतमालाचे भाव घसरल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.पंतप्रधानांनी गटारातून गॅस तयार करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत नाल्यालगत आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित दादा जगताप यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिपक संजयराव भगत, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल भाऊ धवसे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष मंगेश भाऊ जोगे, मो. रियाज (बांधकाम सभापती), सय्यद मोफिक, अतुल भाऊ ठाकूर, रमेश भाऊ ठाकरे, राजेंद्र भाऊ पारधी (सरपंच), पवन भाऊ कारेकर, सुशील भाऊ थोरात, समीर भाऊ दहातोंडे, प्रमोद भाऊ इंझडकर, प्रदीप भाऊ ब्राम्हणवाडे, रणजीत भाऊ मेश्राम, पंकज वानखडे, सुरज भाऊ सोनोने, तन्वीर भाई, पंकज दादा जगणे आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin