बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथे पहाटे साडेचारच्या सुमारास एसटीची दुचाकीला जोरदार धडक झाल्याने भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत संतोष संभाजी काटकर (बुध) होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला असून दुसरा होमगार्ड गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे बुध परिसरावर शोककळा पसरली आहे.
पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ही दुर्घटना दि. ३० मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजता पुसेगाव ते दहिवडी मार्गावर घडली. संजीवनी हॉस्पिटलजवळील कमानीपासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर हा अपघात झाला. दहिवडीकडून येणाऱ्या डिलक्स (MH 11 CB 6805) या दुचाकीला पुसेगावकडून दहिवडीकडे जाणाऱ्या एसटी बसने (MH 10 DT 3874) समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात होमगार्ड दुचाकी चालक संतोष संभाजी काटकर (वय ४५, रा. बुध, ता. खटाव) यांचा जागीच मृत्यू झाला. काटकर हे होमगार्ड पथकात कार्यरत होते. त्यांच्या मागे बसलेले होमगार्ड संतोष बबन माने (वय ४६, रा. बुध, ता. खटाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती देणारे पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत गायकवाड हे त्या वेळी बीट मार्शल व मॉर्निंग स्कॉड ड्युटीवर होते. त्यांनी मोठा आवाज ऐकताच घटनास्थळी धाव घेतली. तेथे दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी अवस्थेत आढळले. तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून दोघांना पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी संतोष काटकर यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात एसटी चालक सचिन रामचंद्र कारंडे (वय ३८, रा. बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने निष्काळजीपणे, भरधाव वेगात आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर चालकास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, अपघातावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातलेले असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. तरीही धडक इतकी भीषण होती की त्यांचा जीव वाचवता आला नाही. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांसह होमगार्ड पथकातील जवानांनी तत्काळ मदतकार्य करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी संबंधित एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डी.बी. बर्गे हे करत आहेत. या अपघातामुळे बुध गावावर शोककळा पसरली असून, मृत संतोष काटकर यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी , आई - वडिल , मुलगा , मुलगी , तीन बहिणी असा परिवार आहे . छायाचित्र _ संतोष काटकर होमगार्ड जवान





Social Plugin