Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावची वाटचाल कचरामुक्तीच्या दिशेने.



कचरा विलगीकरण तसेच प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये विविध प्रकारे जनजागृती

  बुध दि. १४ (प्रकाश राजेघाटगे )

 पुसेगाव येथील कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचयात व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्यावतीने नियोजित उपायांना सर्व घटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. कचरा विलगीकरण तसेच प्लॅस्टिक बंदीबाबत विविध प्रकारे जनजागृती करुन ही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पुसेगाव येथे मोठी बाजारपेठ असून लगतच्या २५ ते ३० गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या यागावमधील कचर्याची समस्या निर्माण झाली आहे. येरळा नदीकाठी कचरा टाकण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेबाबत लगतच्या शेतकर्यांनी हरकत घेतल्याने कचरा टाकणे बंद केले. त्यानंतर ग्रामपंचायतीने अनेक काणी जागा मिळवण्याचा

प्रयत्न केला. परंतु प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी असहकार्याची भूमिका घेतली. गावातील एका ग्रामस्थाने गावापासून दूर असलेली विनावापर जागा भाडे तत्वावर दिली. परंतु तिथे देखील इतर ग्रामस्थांनी हरकत घेऊन आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरु होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय प्लॅस्टिक संकलन व प्रक्रिया केंद्र तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्याचे काम काही दिवसात ग्रामपंचायतीच्या जागेत सुरु होणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य गाभा कचरा विलगीकरणामध्ये आहे. घरातच कचरा विलगीकरण झाले नाही तर प्रकल्पाचा उद्देशही साध्य होणार नाही. त्यामुळे घरामध्ये कचरा विलगीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. बंदी असलेल्या प्लॅस्टिक व थर्माकॉलवर बंदी घातली तरच ही समस्या आटोक्यात येणार आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून सिंगल युजप्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

श्री सेवागिरी महाराज मठामध्ये दर गुरुवारी महाआरतीनंतर महाप्रसादासाठी पूर्णपणे स्टील ताटांचा वापर करून श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सुरुवात करण्यात आली आहे. पुसेगाव हद्दीतील सर्व मंगल कार्यालयांना प्लॅस्टिक ताटे न वापरण्याबाबत तसेच परिसरामध्ये प्लॅस्टिक बंदी व ओल्या कचर्याचे आपल्या स्तरावर नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. गावातील विविध मंडळांना प्लॅस्टिक बंदी तसेच स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे तसेच व्यापारी वर्गाला प्लॅस्टिक बंदीबाबत नोटिशीद्वारे शासन अधिसूचनेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सुका कचरा स्वतंत्र व कोणत्याही परिस्थितीत ओला कचरा या सोबत स्वीकारला जाणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.  चौकट- कचरा विलगीकरणाबाबत महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे .  प्लॅस्टिक बंदी व कुटुंब स्तरावर कचरा विलगीकरण यामध्ये कचरा समस्येचे निराकरण आहे. श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन व सर्व विश्वस्तांनी मंदिरामध्ये प्लॅस्टिक बंदी व महाप्रसादासाठी स्टील ताटांचा वापर करून सकारात्मक सुरुवात केली आहे. गावातील सर्वच घटक देखील सहकार्य देतील हा विश्वास आहे.

-