डाॅ.यशवंत पवार @ 28/03/2026
कन्नड- (छत्रपती संभाजीनगर )
व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले राजेंद्र गव्हाणे यांना राज्य शासनाचा मानाचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये २६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंढे, उपायुक्त पी. बी. वाबळे, माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, आमदार डॉ. तुषार राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या गौरव सोहळ्याप्रसंगी बोलताना राजेंद्र गव्हाणे म्हणाले, की हा पुरस्कार गेल्या वीस वर्षांपासून केलेल्या कामाची पावती आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. माझी पत्नी संगीता, तसेच मोहित आणि हर्षदा या माझ्या मुलांनी मला वेळोवेळी साथ दिल्यानेच मी या पुरस्काराच मानकरी ठरलो. हा पुरस्कार मी माझ्या आईवडिलांना अर्पण करतो, अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. राजेंद्र गव्हाणे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे कन्नड येथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.
*व्यसनमुक्तीवर जागृती*
राजेंद्र गव्हाणे गेल्या २0 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्यासाठी विविध उपक्रम राबविले असून, अनेकांनी व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला आहे. गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक, तसेच शालोपयोगी साहित्य वाटप केले आहे. निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे प्रबोधन केले आहे. या पुरस्कारामुळे कन्नड तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





Social Plugin