Ticker

6/recent/ticker-posts

खटावमध्ये पोलिसांकडून कारवाई नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल; रोडरोमिओंवरही करडी नजर.




बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे] 

खटाव  येथे वारंवार वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर पुसेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने  दंडात्मक कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

गावातील मुख्य रस्त्यावर 'नो पार्किंग' झोनमध्ये उभ्या केलेल्या वाहनांमुळे तसेच रोडरोमिओंच्या वर्दळीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासून विशेष तपासणी मोहीम हाती घेत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.

कारवाईत वाहतूक पोलिस कर्मचारी संतोष बागल, बापूराव नवत्रे, सार्जंट बकरे तसेच तोडकर यांनी सहभाग घेतला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड ठोठावण्यात आला असून, भविष्यातही अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, गावातील नागरिकांच्या वतीने या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. पोलिसांनी वेळोवेळी अशी मोहीम राबविल्यास गावातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरळीत राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे, तसेच सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.    छायाचित्र -खटाव : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करताना पुसेगाव पोलिस. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध